शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
पुणे
dr. sharankumar limbale
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि सरस्वती सन्मानप्राप्त डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी मंगळवारी केली.
 
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात २७ ते ३० जानेवारीदरम्यान होणार आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महामंडळाच्या बैठकीत दहा साहित्यिकांच्या नावांवर चर्चा झाली. यामध्ये चंद्रकांत भोंजाळ, श्रीकांत देशमुख, उमा कुलकर्णी, शेषराव मोरे, पी. एस. लोक, सुधाकर गायधनी, प्रवीण दवणे, मंगला गोडबोले, बाबा भांड आणि डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा समावेश होता. सर्व नावांचा विचार केल्यानंतर महामंडळाने एकमताने डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या नावाची निवड केली.
 
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्यासह रमेश पतंगे, विजय कुवळेकर आणि बाबा भांड यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अंतर्गत मतभेदांमुळे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया चर्चेत आली होती. शासकीय निधीच्या हिशेबावरून आणि आर्थिक अनियमिततेच्या मुद्द्यावरून परिषदेतील वाद चिघळला होता. मसापचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधात कार्यकारिणीतील २१ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. हे तिघेही साहित्य महामंडळाचे प्रमुख पदाधिकारी असल्याने त्यांना कामकाजाचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार राहिला नसल्याचा दावा या सदस्यांनी केला होता. त्यामुळे या गटाने महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम सप्रे यांना पत्र पाठवून लिंबाळे यांच्यासह अन्य नावांचा अध्यक्षपदासाठी विचार करण्याची मागणी केली होती.

कोण आहेत डॉ. शरणकुमार लिंबाळे?

डॉ. शरणकुमार लिंबाळे हे मराठीतील महत्त्वाचे आंबेडकरवादी साहित्यिक म्हणून ओळखले जातात. एका छोट्या गावातील संघर्षमय बालपणापासून साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ‘सरस्वती सन्मान’पर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी मानला जातो. जातीय भेदभाव, गरिबी आणि सामाजिक विषमता यांचे अनुभव त्यांच्या लेखनातून प्रभावीपणे व्यक्त झाले आहेत. त्यांनी आत्मकथन, कादंबरी, कथा, कविता आणि समीक्षेच्या माध्यमातून मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. त्यांची ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांपैकी अनेक साहित्यकृतींचे विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.डॉ. लिंबाळे यांचा जन्म १ जून १९५६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे झाला. बालपणापासूनच त्यांना जातीयता, गरिबी आणि सामाजिक विषमतेचा सामना करावा लागला. या अनुभवांनी त्यांच्या साहित्यिक जडणघडणीवर मोठा प्रभाव टाकला.

त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ‘मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन ब्लॅक लिटरेचर : एक तौलनिक अभ्यास’ या विषयावर त्यांनी पीएच.डी. मिळवली. ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकातून त्यांच्या लेखनप्रवासाला सुरुवात झाली.

‘अक्करमाशी’ने मिळवून दिली वेगळी ओळख

२० जुलै १९८४ रोजी प्रकाशित झालेल्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथनामुळे डॉ. लिंबाळे यांचे नाव साहित्यविश्वात विशेष चर्चेत आले. जातिव्यवस्थेचे वास्तव, सामाजिक विषमता आणि व्यक्तीच्या अस्तित्वाचा संघर्ष यांचे प्रामाणिक चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे. या आत्मकथनाने मराठी साहित्याला नवा दृष्टिकोन दिला. पुढे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ‘The Outcaste’ या नावाने त्याचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला.

आकाशवाणीपासून मुक्त विद्यापीठापर्यंतचा प्रवास

१९८६ ते १९९२ या काळात डॉ. लिंबाळे यांनी सोलापूर आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून काम केले. त्यानंतर नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सहायक संपादक म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. पुढे प्राध्यापक आणि संचालक या पदांवरही त्यांनी काम केले. या विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले.

दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राची मांडणी

डॉ. लिंबाळे यांनी साहित्यनिर्मितीबरोबरच दलित साहित्याच्या वैचारिक आणि सैद्धांतिक मांडणीतही महत्त्वाचे योगदान दिले आहे. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ हा त्यांचा समीक्षाग्रंथ विशेष गाजला. या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद ‘Towards an Aesthetics of Dalit Literature’ या नावाने प्रसिद्ध झाला. दलित साहित्यामध्ये कल्पनेपेक्षा प्रत्यक्ष जीवनानुभवाला महत्त्व असले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या विचारांचा अभ्यास विविध विद्यापीठांमध्ये केला जातो.२०११ मध्ये नांदेड येथे झालेल्या बाराव्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. लिंबाळे यांनी भूषवले होते. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली.२०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘सनातन’ या ऐतिहासिक कादंबरीसाठी त्यांना के. के. बिर्ला फाऊंडेशनचा २०२० चा प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’ जाहीर झाला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले दलित साहित्यिक ठरले. या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद २०२४ मधील जेसीबी साहित्य पुरस्काराच्या अंतिम यादीतही समाविष्ट झाला. सामाजिक न्याय आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल जुलै २०२५ मध्ये त्यांना केरळमधील ‘चिंता रवींद्रन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे लेखन केवळ आत्मकथनापुरते मर्यादित नाही. ‘अक्करमाशी’, ‘पुन्हा अक्करमाशी’, ‘बारामाशी’ आणि ‘राणीमाशी’ ही त्यांची आत्मकथनात्मक पुस्तके वाचकांच्या परिचयाची आहेत. ‘सनातन’, ‘हिंदू’, ‘बहुजन’, ‘झुंड’, ‘दंगल’, ‘उपल्या’, ‘रामराज्य’ आणि ‘ओ’ या त्यांच्या कादंबऱ्यांनीही साहित्यविश्वात लक्ष वेधले.

‘हरिजन’, ‘रथयात्रा’, ‘उद्रेक’ आणि ‘गावकुसाबाहेरील कथा’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’, ‘प्रज्ञासूर्य’, ‘दलित पँथर’, ‘दलित ब्राह्मण’, ‘ब्राह्मण्य’, ‘वादंग’ आणि ‘दलित फाईल्स’ या ग्रंथांतून त्यांनी सामाजिक, वैचारिक आणि साहित्यिक विषयांवर भाष्य केले आहे.

लेखनाचे वेगळेपण

डॉ. लिंबाळे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक वास्तवाचे थेट आणि निर्भीड चित्रण. वंचित समाजाचे जगणे, जातीय विषमता आणि सामाजिक अन्याय यांचे अनुभव त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता शब्दबद्ध केले. त्यांच्या साहित्यामुळे दलित जीवनाचे वास्तव व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या साहित्याची दखल घेतली गेली.

आता शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या साहित्यिक प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे. मराठी साहित्याच्या शतकमहोत्सवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते कोणती भूमिका मांडतात, याकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.

पुणे ग्रँड टूरमुळे संमेलनाच्या तारखांत बदल
 
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यापूर्वी २८ ते ३१ जानेवारीदरम्यान आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, याच कालावधीत पुणे ग्रँड टूरचे आयोजन होणार असल्याने संमेलनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार आता हे संमेलन २७ ते ३० जानेवारीदरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार असल्याचे योगेश सोमण यांनी जाहार केले.