नाशिक
fire breaks भिकुसा मिलजवळील हिरावाडी रोड परिसरातील वज्रेश्वरी झोपडपट्टीतील वाल्मिकनगर येथे मंगळवारी अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या आगीत सहा घरांचे मोठे नुकसान झाले असून, एका घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण करीत आसपासच्या घरांनाही विळखा घातला. मात्र, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि शेजारील घरांना आगीपासून वाचवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या आगीत सहा घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गाद्या, पंखे, दूरचित्रवाणी संच यांसह घरातील इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले. काही घरांमधील भांडी आणि अन्य साहित्य वाचवण्यात नागरिकांना यश आले. अचानक लागलेल्या आगीमुळे रहिवाशांची मोठी धावपळ उडाली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख हर्षद पटेल, लीडिंग फायरमन संजय कानडे, सुनील शिलावट, संदीप जाधव, कर्मचारी प्रथमेश गवळे आणि ऋषिकेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे, लीडिंग फायरमन मंगेश पिंपळे, व्ही. पी. शिंदे आणि वाहनचालक बी. बी. काकडे यांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीचा फैलाव रोखल्याने आजूबाजूची घरे सुरक्षित राहिली.
या दुर्घटनेत शांताबाई सखाराम जाधव, मीना मोरे, सुनीता जाधव, मोहन धोत्रे, आशा मिरजकर, दिलीप पवार आणि नर्मदा इंगोले यांच्या घरांचे नुकसान झाले. दरम्यान, प्रभागातील लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि बाधित कुटुंबांची विचारपूस केली. यावेळी नगरसेवक गौरव गोवर्धने, मच्छिंद्र सानप, प्रियंका माने आणि जुई शिंदे उपस्थित होते.
झोपडपट्टीतील दाटीवाटीची वस्ती आणि एका घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट यामुळे आग अधिक भडकण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. आगीत घरांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.