गोंदिया,
gondia accident भरधाव आयशर ट्रकने सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स उडवत थेट मजुराला चिरडले. या भीषण अपघातात ३८ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी/ख. येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. डूडेश्वर धनलाल चुटे (३८) रा. बाम्हणी/ख. असे मृत मजुराचे नाव आहे.

डुडेश्वर हे आर.आर.एम. कंपनीच्या माध्यमातून महामार्गाच्या कामावर कार्यरत होते. घटनेच्या वेळी ते रस्त्याच्या मध्यभागी वाढलेले गवत व काटेरी झुडपे कापण्याचे काम करीत होते. दरम्यान, कोहमाराकडून देवरीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्या ट्रक क्रमांक जेएच ०२ बीडब्ल्यू ५१११ च्या चालकाचे ट्रकवरून नियंत्रण सुटल्याने कामाच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेड्सला धडक देत ट्रक थेट डूडेश्वर यांच्या अंगावर गेला. या भीषण अपघातात डुडेश्वर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही क्षणांत घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली, तर काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.