सिंधुदुर्ग,
hapus-mango-gi-tag-disputeकोकणच्या मातीत जन्मलेला, समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा स्पर्श आणि विशिष्ट नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळे जगभरात प्रतिष्ठा मिळवलेला देवगड-रत्नागिरीचा हापूस आता गुजरातच्या बाजारपेठीय महत्त्वाकांक्षेच्या निशाण्यावर असल्याचा गंभीर आरोप सिंधुदुर्ग फळ बागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी केला आहे.
गुजरातमधील ‘वलसाड’च्या आंब्याला ‘हापूस’ नावाने जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांमुळे कोकणच्या आंबा उत्पादकांमध्ये त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रश्न गुजरातच्या आंब्याचा नाही, तर कोकणच्या हापूसच्या नावावर कोणाचा अधिकार राहणार हा आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामुळे हापूसच्या विशिष्ट ओळखीला कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. मात्र, गुजरातमधील वलसाडच्या आंब्यासाठीही ‘हापूस’ नाव वापरण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप होत आहे. यामुळे कोकणच्या आंब्याच्या स्वतंत्र ओळखीवर आणि बाजारपेठेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकार तसेच विविध संघटना आणि संस्थांनी यावर आवाज उठवावा, अशी मागणी होत आहे.
या विषयात काही तज्ज्ञ मंडळींनी कायदेशीर बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ही लढाई केवळ काही व्यक्तींची न राहता संपूर्ण कोकणातील आंबा उत्पादकांची सामूहिक लढाई झाली पाहिजे असे मत सावंत यांनी व्यक्त केले आहे. कोकणच्या हापूसची नैसर्गिक चव, सुगंध, दर्जा आणि भौगोल वैशिष्ट्ये इतरत्र सहज निर्माण करता येत नाहीत. त्यामुळे या नावाचे आणि त्यावरील जीआय हक्कांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आंब्याच्या दाव्यांसंदर्भात निर्णय राखीव
चेन्नई येथील ‘जीआय’ नोंदणी कार्यालयात गुजरात आणि कोकण यांच्या हापूस आंब्याच्या दाव्यांसंदर्भात सुनावणी झाली असून निर्णय राखून ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. या गंभीर प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी पुरेसा अभ्यास न केल्याची टीका सावंत यांनी केली आहे