पिंपरी-चिंचवड
hinjewadi murder case पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तिचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी रात्रभर मृतदेहाशेजारी बसून होता. सकाळी त्याने स्वतः पोलिसांच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

कोमल डहाके आणि शुभम ज्ञानेश्वर कालबांडे अशी मृत तरुणी आणि आरोपीची नावे आहेत. हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते एकत्र राहत होते. दोघांच्या लग्नालाही त्यांच्या कुटुंबीयांची संमती होती. मात्र, शुभमचे अन्य तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा कोमलला संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.
या वादाचे रूपांतर पुढे हिंसक घटनेत झाले. शुभमने कोमलच्या डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कोमलचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्यानंतरही शुभमने रात्रभर मृतदेहाशेजारीच वेळ घालवला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोमलला तातडीने रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी शुभम कालबांडे याला अटक केली आहे. घटनेमागील नेमकी कारणे आणि अन्य बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी दिली.