शाळेच्या बसला ट्रकची धडक, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
कन्नौज
kannauj bus accident 
उत्तर प्रदेशातील कन्नौजजवळ आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर मंगळवारी पहाटे भीषण रस्ते अपघात झाला. पिकनिकवरून परतणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, ३५ जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.



कन्नौज जिल्ह्यातील ठठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक्स्प्रेस वेवरील २०९ व्या किलोमीटरजवळ ही घटना घडली. आग्रा येथील शाळेतील विद्यार्थी पिकनिकसाठी कौशांबी येथे गेले होते. मंगळवारी हे विद्यार्थी बसने परतत असताना एक्स्प्रेस वेवर बस थांबवण्यात आली होती. त्याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. या बसमध्ये सुमारे ५० विद्यार्थी आणि सहा शिक्षक प्रवास करत होते.

अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य सुरू करून जखमी विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकांच्या मदतीने तिर्वा येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. जिल्हाधिकारी आशुतोष मोहन अग्निहोत्री आणि पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि डॉक्टरांना आवश्यक ते उपचार तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशांबी येथून सुमारे ५० विद्यार्थी आणि शालेय कर्मचाऱ्यांना घेऊन बस परतत होती. मंगळवारी पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवरील २०९ व्या किलोमीटरजवळ ट्रकने बसला मागून धडक दिली. तिर्वा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये चार विद्यार्थ्यांना मृत घोषित करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी कानपूर येथे हलवण्यात येणार आहे. किरकोळ जखमी झालेल्या २२ विद्यार्थ्यांवर तिर्वा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या वेळी बस एक्स्प्रेस वेच्या कडेला उभी होती. विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहासाठी थांबवण्यात आले होते, अशी माहिती एका जखमी विद्यार्थ्याने दिली. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने बसला धडक दिली. दरम्यान, अपघातातून बचावलेल्या विद्यार्थ्यांना आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या वाहनांची व्यवस्था करून घरी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला का, यासह अन्य बाबींचा तपास केला जात आहे.

दरम्यान, राजस्थानमध्येही दोन दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. कोटा-उदयपूर महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला प्रवाशांनी भरलेल्या वाहनाची धडक बसली होती. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. सलग घडणाऱ्या या अपघातांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.