राज्यात नऊ नवीन अपर तहसीलदार कार्यालये

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
नागपूर
maharashtra government
महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी करावी लागणारी नागरिकांची धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने नऊ नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक आणि नागपूर विभागातील या कार्यालयांची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्याचाही समावेश आहे.



नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव शहर, जामनेर तालुक्यातील पहूर आणि चाळीसगाव येथे अशी तीन कार्यालये कार्यान्वित केली जातील. नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार आणि शहादा, तर धुळे जिल्ह्यात शिरपूर शहर येथे नवीन कार्यालये सुरू होणार आहेत.

नागपूर विभागात सावनेर तालुक्यासाठी मौजे चिचोली (खापरखेडा) येथे, तर गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यातील आष्टी येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन केले जाणार आहे.या कार्यालयांमुळे जमिनीशी संबंधित महसुली कामांसाठी नागरिकांना दूरवरच्या तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. संबंधित कार्यालयांना नेमून दिलेल्या क्षेत्रातील महसुली अधिकार आणि कामे स्थानिक पातळीवरच पार पाडली जातील. त्यामुळे नागरिकांना आपल्या भागातच जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.दरम्यान, निवडणुकीशी संबंधित कामे, संजय गांधी निराधार योजना तसेच अन्य बिगरमहसुली कामे मात्र मूळ तहसीलदार कार्यालयामार्फतच केली जाणार आहेत. अशा कामांसाठीचे अर्ज किंवा निवेदने नवीन अपर तहसीलदार कार्यालयात प्राप्त झाल्यास ती पुढील कार्यवाहीसाठी संबंधित मूळ तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येतील, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.