मुंबई,
maharashtra-hepatitis-b-c-cases-riseमहाराष्ट्रात नव्याने निदान झालेल्या हेपेटायटिस-बीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, चार वर्षांत ही संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. २०२२-२३ मध्ये ९,२६० असलेली रुग्णसंख्या २०२५-२६ मध्ये १८,१२२ वर पोहोचली आहे. याच कालावधीत हेपेटायटिस- सीच्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून, ४७९ वरून ८६४ पर्यंत रुग्णसंख्या वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
हेपेटायटिस-बी आणि सी हे विषाणूजन्य संसर्ग असून, प्रामुख्याने यकृतावर परिणाम करतात. उपचार न केल्यास या संसर्गामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते. दोन्ही संसर्ग दीर्घकालीन स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे यकृताचा सिरोसिस आणि यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. हेपेटायटिस-बीचा संसर्ग दूषित रक्त, शरीरातील द्रव, असुरक्षित इंजेक्शन तसेच संक्रमित मातेकडून बाळाला होऊ शकतो. तर हेपेटायटिस-सीचा संसर्ग प्रामुख्याने संक्रमित रक्ताच्या संपर्कातून होतो.
हेपेटायटिस-बी प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे, तर हेपेटायटिस सीवर योग्य विषाणूविरोधी औषधांनी उपचार करून बरे करता येते, असे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.
आकडेवारीनुसार, चार वर्षांत हेपेटायटिस-बीच्या नव्या रुग्णांमध्ये जवळपास ९६ टक्के वाढ झाली आहे, तर हेपेटायटिस-सीच्या रुग्णांमध्ये सुमारे ८० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रात २०२३-२४ मध्ये हेपेटायटिस-बीचे १२,२५० रुग्ण आढळले, तर २०२४-२५ मध्ये ही संख्या १३,७१२ झाली. हेपेटायटिस-सीचे रुग्ण अनुक्रमे ६९५ आणि ७९० होते.
महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माहितीनुसार, राष्ट्रीय विषाणूजन्य हेपेटायटिस नियंत्रण कार्यक्रम जुलै २०१९ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. तपासणी, निदान आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात चार मॉडेल उपचार केंद्रे आणि अन्य ३२ उपचार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.