मुंबई
maharashtra paper leak राज्यात गेल्या काही महिन्यांत स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरती परीक्षांच्या पेपरफुटीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेपरफुटी आणि परीक्षांमधील संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० कोटी रुपयांपर्यंत दंड आणि १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाला सादर करण्यात आला. या अहवालात परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर कायदा करण्यासह परीक्षा व्यवस्थेत व्यापक प्रशासकीय सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.
समितीच्या शिफारशीनुसार, पेपरफुटीच्या संघटित गुन्हेगारीत सहभागी असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना सात ते दहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद करण्याचे सुचवण्यात आले आहे. परीक्षांमध्ये अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना पाच ते दहा वर्षे कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची शिफारस आहे. तसेच गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या सेवा पुरवठादार संस्थांना पाच कोटी रुपयांपर्यंत दंड आणि आठ वर्षांपर्यंत बंदी घालण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे.
परीक्षांमधील गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली आहे. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष कृती दल अर्थात एसटीएफ स्थापन करण्याची सूचना आहे. अशा प्रकरणांतील खटले दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत, यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या अहवालात उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण शिफारशी करण्यात आल्या आहेत. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत मिळावे, अशी सूचना आहे. तसेच उत्तरतालिकेवर उमेदवाराने घेतलेली हरकत योग्य ठरल्यास त्या हरकतीसाठी भरलेले शुल्कही परत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याची सूचनाही समितीने केली आहे. उमेदवारांना आधार किंवा महाआयडीच्या माध्यमातून एकदाच नोंदणी करता यावी, अशी सुविधाही प्रस्तावित आहे.
परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याचबरोबर रिक्त पदांची माहिती वेळेत उपलब्ध व्हावी आणि भरती प्रक्रियेत विलंब होऊ नये, यासाठी ‘इंटिग्रेटेड रिक्विझिशन पोर्टल’ विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. विविध शासकीय विभागांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत भरतीसाठीची मागणीपत्रे एमपीएससीकडे पाठवावीत, अशी सूचना करण्यात आली आहे.
परीक्षा आयोजनाची जबाबदारी अधिक परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्याची शिफारस आहे. याशिवाय परीक्षा केंद्रांची स्वतंत्र यादी अर्थात ‘व्हेन्यू बँक’ तयार करण्याचे सुचवण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांची निवड आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा प्रस्तावही अहवालात आहे. परीक्षा प्रक्रियेतील डिजिटल गैरप्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने ४ सप्टेंबर २०२६ रोजी या उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या दुसऱ्या अहवालात कठोर कायदेशीर तरतुदींसोबतच परीक्षा व्यवस्थेतील तांत्रिक आणि प्रशासकीय सुधारणांवर भर दिला आहे. या शिफारशींची शासनाकडून अंमलबजावणी झाल्यास राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरती प्रक्रियेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अहवालातील शिफारशींवर सरकार पुढे कोणता निर्णय घेते, याकडे लाखो परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.