त्रिशूर
malayalam actor sreejith ravi मलयाळम चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते टी. जी. रवी यांचे पुत्र आणि मलयाळम चित्रपटांतील अभिनेते श्रीजीत रवी यांना अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळप्रकरणी केरळमधील न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०२२ मध्ये घडलेल्या या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलींनी अभिनेत्यावर अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला होता. त्रिशूर येथील फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय क्रमांक दोनने सुनावणीअंती त्यांना पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांनुसार दोषी ठरवले. दरम्यान, उच्च न्यायालयात अपील करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला एक महिन्यासाठी स्थगिती दिली आहे.
दोन मुलींच्या साक्षीवरून न्यायालयाचा निकाल
विशेष न्यायाधीश रेम्या मेनन यांनी श्रीजीत रवी यांना पॉक्सो कायद्याच्या कलम १२ सह कलम ११(i) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९ अंतर्गत दोषी ठरवले. पॉक्सो कायद्यातील ही कलमे बालकांच्या लैंगिक छळाशी संबंधित आहेत, तर भादंविचे कलम ५०९ एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या उद्देशाने केलेल्या शब्द, हावभाव किंवा कृतींशी संबंधित आहे.
न्यायालयाने दोन्ही पीडित मुलींच्या साक्षीला महत्त्वपूर्ण मानले. घटनेच्या वेळी त्यांचे वय अनुक्रमे १४ आणि १० वर्षे होते. दोघींनीही न्यायालयात घटनेचे वर्णन सातत्याने एकसारखे केले आणि आरोपीची ओळख पटवली. त्यांच्या साक्षीत सातत्य असल्याचे नमूद करत, केवळ मुलींना अभिनेत्याचे नाव माहीत नव्हते म्हणून त्यांची साक्ष अविश्वसनीय ठरवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
ही घटना ४ जुलै २०२२ रोजी घडल्याचा आरोप आहे. अभियोजन पक्षाच्या माहितीनुसार, दोन्ही मुली शाळा सुटल्यानंतर त्रिशूरमधील अरनाट्टुकारा येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये परतत होत्या. त्यावेळी श्रीजीत रवी यांनी कारमधून त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. अपार्टमेंटच्या वाहनतळ परिसरात त्यांनी मुलींसमोर अश्लील कृत्य केल्याचे अभियोजन पक्षाने न्यायालयात सांगितले.
सुनावणीदरम्यान दोन्ही मुलींनी न्यायालयात श्रीजीत रवी यांना ओळखले. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यांच्या ओळख पटवण्यावर प्रश्न उपस्थित केला. अभिनेता चित्रपटसृष्टीतील परिचित चेहरा असूनही मुलींना त्यांचे नाव सांगता आले नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. मुलींनी आरोपीची ओळख सातत्याने पटवली असून, त्याच्या शारीरिक उपस्थितीचेही वर्णन केले आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव माहीत नसणे म्हणजे तिची ओळख पटवण्यात चूक झाली, असे मानता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
पोलिस तपासातील त्रुटींकडेही न्यायालयाचे लक्ष
या प्रकरणाच्या तपासात काही त्रुटी राहिल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा न करणे, ही त्यातील एक महत्त्वाची बाब होती. मात्र, तपासातील या त्रुटींमुळे दोन्ही मुलींनी दिलेल्या सातत्यपूर्ण साक्षीची विश्वासार्हता कमी होत नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
शिक्षा महिनाभरासाठी स्थगित; २३ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश
श्रीजीत रवी यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे शिक्षेत नरमाई दाखवण्याची विनंती केली होती. अभिनेत्याची यापूर्वीची प्रतिमा स्वच्छ असल्याचा आणि या प्रकरणामुळे त्यांच्या अभिनय कारकिर्दीवर परिणाम झाल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. मात्र, न्यायालयाने ही विनंती मान्य केली नाही. शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना लक्ष्य करण्यात आले असून, या घटनेचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाने नमूद केले.
तसेच, अभिनेत्याकडून वसूल करण्यात येणारा दंड दोन्ही पीडित मुलींना समान प्रमाणात नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. दोषी ठरवल्यानंतर श्रीजीत रवी यांनी वरिष्ठ न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला एक महिन्यासाठी स्थगिती दिली. ५० हजार रुपयांचा जातमुचलका आणि दोन जामीनदारांच्या अटीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच २३ डिसेंबर २०२६ रोजी कनिष्ठ न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.