मुंबई
marathi film gondhal मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला आणि गोंधळ विधीवर आधारित संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने ऑस्करच्या दिशेने महत्त्वाची झेप घेतली आहे. ९९ व्या अकादमी पुरस्कारांच्या ‘आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म’ या श्रेणीसाठी पात्र ठरलेल्या १०४ चित्रपटांच्या यादीत ‘गोंधळ’चा समावेश करण्यात आला आहे. ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने मंगळवारी याबाबतची घोषणा केली.

या यादीत स्थान मिळणे ही चित्रपटासाठी महत्त्वाची बाब असली, तरी त्याची थेट ऑस्करसाठी निवड झाली आहे किंवा त्याला नामांकन मिळाले आहे, असा याचा अर्थ होत नाही. ऑस्कर पुरस्कारांच्या पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ‘गोंधळ’ पात्र ठरला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली दखल उमटवण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पारंपरिक गोंधळ विधी, संगीत, नृत्य, पौराणिक कथा आणि धार्मिक परंपरा यांचा संगम या चित्रपटात पाहायला मिळतो. संतोष डावखर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये पार पडलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ‘सिल्व्हर पीकॉक’ पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
‘गोंधळ’ची कथा ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर घडते. चित्रपटात सुमन नावाच्या महिलेची कहाणी मांडण्यात आली आहे. तिचे लग्न आनंद नावाच्या एका श्रीमंत व्यक्तीशी झालेले असते; मात्र वैवाहिक आयुष्यात ती समाधानी नसते. अशातच तिचे एका गोंधळी कलाकारावर प्रेम जडते. या नात्यानंतर सुमन आपल्या विवाहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागते. या प्रवासात आणखी काही व्यक्तिरेखा सहभागी होतात आणि कथेला वेगळी वळणे मिळतात. पुढे प्रेम, हत्या, फसवणूक आणि जगण्यासाठीचा संघर्ष अशा अनेक घटनांभोवती चित्रपटाचे कथानक उलगडत जाते.
या चित्रपटात इशिता देशमुख, किशोर कदम, योगेश सोहोनी, निषाद भोईर आणि अनुज प्रभू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पारंपरिक लोककलेचा विषय आणि ग्रामीण जीवनातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधांची मांडणी यामुळे ‘गोंधळ’ने विशेष लक्ष वेधले आहे.
दरम्यान, ९९ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या पुढील प्रक्रियेला डिसेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. निवडक विभागांमधील प्राथमिक मतदान ७ ते ११ डिसेंबर २०२६ या कालावधीत होईल. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी शॉर्टलिस्ट जाहीर केली जाणार आहे. ऑस्कर नामांकनांची घोषणा २१ जानेवारी २०२७ रोजी होणार असून, पुरस्कार सोहळा १४ मार्च २०२७ रोजी हॉलीवूडमधील ओव्हेशन हॉलिवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे आता ‘गोंधळ’ पुढील फेरीत स्थान मिळवतो का, याकडे मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.