गोंदियाच्या चिखलीत विवाहितेची हत्या

- संशयावरून पती पोलिसांच्या ताब्यात - डोक्यावर, मानेवर वार, घटनास्थळावरून कुर्‍हाड जप्त

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
गोंदिया,
murdered in chikhli सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना २४ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. रामकला जागेश्वर शिवणकर (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून तिचा पती जागेश्वर आसाराम शिवणकर (४५) याला ताब्यात घेतले असून, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
 
murdered in chikhli
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, शिवणकर दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून नेहमी वाद होत असल्याची चर्चा असून २३ नोव्हेंबर रोजी रात्री घरी कुटूंबातील सर्वांनी एकत्र जेवण केले. मात्र, जेवणाच्या वेळी पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. यानंतर सगळे झोपी गेले. मात्र, दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत रामकला उठली नसल्याने शेजार्‍यांनी आवाज देऊन पाहिले. त्यानंतर पती जागेश्वरने घराचा दरवाजा उघडला आणि शेताकडे निघून गेल्याची माहिती आहे. आई अद्याप उठली नसल्याने मुलांनी खोलीत जाऊन पाहिले असता रामकला रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. तिच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर गंभीर जखमा होत्या. खोलीतील भिंती, जमिनीवरील अंथरूण तसेच परिसरात रक्ताचा सडा आढळून आल्याने रात्रीच्या सुमारासच तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सडक-अर्जुनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले.murdered in chikhli पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, घरात आढळलेली कुर्‍हाड तसेच अन्य आवश्यक नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मृत महिलेचा पती जागेश्वर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण काय, तसेच या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. फॉरेन्सिक तपास आणि पोलिस चौकशीनंतरच हत्येचा उलगडा होणार आहे.