मोनिका किरणापुरेच्या हत्याकांडातील आरोपीला मिळाला लग्नासाठी जामीन

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
monika kiranapure murder case
राज्यातील बहुचर्चित असलेल्या नागपुरात २०११ मध्ये घडलेल्या मोनिका किरणापुरे हत्याकांडातील आरोपी कुणाल ऊर्फ गोलू अनिल जयस्वाल याला लग्न करण्यासाठी सात दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. मोनिका किरनापुरे हिची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कुणाल आता लग्न करण्यासाठी जेलमधून बाहेर येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘स्वतःच्या लग्नासाठी कैद्याला पॅरोल मिळण्याचा अधिकार आहे,’ असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी जामीन मंजूर केला.



कुणाल ऊर्फ गोलू अनिल जयस्वाल हा सध्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याचा विवाह ४ डिसेंबर २०२६ रोजी नागपुरात होणार आहे. या विवाहासाठी त्याने कारागृह प्रशासनाकडे सात दिवसांच्या पॅरोलची मागणी केली होती. मात्र, कारागृह नियमावलीमध्ये कैद्याच्या स्वतःच्या विवाहासाठी पॅरोल देण्याची स्पष्ट तरतूद नसल्याचे कारण देत कारागृह उपमहानिरीक्षकांनी त्याचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.



पॅरोल नाकारता येणार नाही

याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने कारागृह नियमावलीतील तरतुदींचा विचार केला. नियमावलीमध्ये कैद्यांच्या मुलांच्या तसेच भावंडांच्या विवाहासाठी पॅरोल देण्याची तरतूद आहे. मात्र, स्वतःच्या विवाहासाठी पॅरोल देण्याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने कारागृह प्रशासनाने अर्ज नाकारला होता. नियमावलीत स्वतःच्या विवाहासाठी पॅरोलची स्पष्ट तरतूद नसली, तरी केवळ असा उल्लेख नाही म्हणून कैद्याला पॅरोल नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मुलांच्या आणि भावंडांच्या विवाहासाठी असलेली तरतूद कैद्याच्या स्वतःच्या विवाहालाही लागू होऊ शकते, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. या निर्णयामुळे कुणाल जयस्वाल याचा विवाहासाठी कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगाचा विचार करत न्यायालयाने दिलेला हा निर्णय पॅरोलच्या नियमांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


असे घडले मोनिका हत्याकांड

आरोपी कुणाल जयस्वाल हा किरणापुरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड होता. प्रेयसीची हत्या करण्यासाठी गेला असताना तिच्यासारखा स्कार्फ बांधून महाविद्यालयात जाणाऱ्या मोनिकाची आरोपींनी २०११ मध्ये हत्या केली होती. कुणाल यानेच हल्लेखोरांना सुपारी दिली होती. पण त्यांनी कुणालची प्रेयसी समजून मोनिकाला संपवले होते. या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आता त्याच आरोपीच्या विवाहासाठी पॅरोल मंजूर करण्याच्या निर्णयामुळे हे हत्याकांड पुन्हा चर्चेत आले आहे. त्याला पॅरोल मंजूर झाल्यामुळे या हत्याकांडाला उजाळा मिळाला आहे.