मुंबई
mpsc paper leak case महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रातून अनेक महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. आयोगातील एका सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याने प्रश्नसंचातील सुमारे ३०० प्रश्न स्वतःच्या लॅपटॉपवर टाईप केले. त्यांची प्रिंट काढून नवी मुंबईतील आयोगाच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याकडे हे प्रश्न सुपूर्द केल्याचा आरोप आहे. विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयात शुक्रवारी तीन हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

या प्रकरणात सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकते याला मुख्य सूत्रधार ठरवण्यात आले आहे. पेपरफुटी उघडकीस आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याचे संरक्षण मिळावे, या हेतूने नाकतेने अवर सचिव अभिजित लेंडवे याला कटात सहभागी करून घेतल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा उलगडा ऋतुजा पाटील आणि तिचा प्रियकर लोकेश ऊर्फ गौरव पाटील यांच्यातील संबंध बिघडल्यानंतर झाला. ऑगस्टमध्ये पहिल्या अटकसत्रानंतर पोलिसांनी गौरवला या प्रकरणातील माहिती उघड करणारा (व्हिसलब्लोअर) म्हणून संबोधले होते. तात्पुरत्या गुणवत्ता यादीत ऋतुजाने सातवा क्रमांक मिळवला होता. गौरवनेच तिच्यासाठी परीक्षेतील प्रश्नांची व्यवस्था केल्याचा आरोपही पोलिसांनी केला होता.
आता दाखल झालेल्या आरोपपत्रातून या दोघांचे नाते का तुटले, याची माहिती समोर आली आहे. ऋतुजाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पालकांचा गौरवसोबतच्या नात्याला विरोध होता. तिने गौरवला सोडले नाही, तर आत्महत्या करू, अशी धमकी पालकांनी दिल्याचे तिने सांगितले. या दबावामुळे परीक्षेनंतर तिने गौरवशी बोलणे बंद केले आणि नाते संपवले. त्यामुळे संतप्त झालेल्या गौरवने एमपीएससीला ईमेल पाठवून ऋतुजाकडे परीक्षेपूर्वीच प्रश्न उपलब्ध असल्याचा आरोप केला. ऋतुजाला गौरवशी लग्न करायचे होते; मात्र पालकांच्या दबावामुळे तिने त्याच्याशी संपर्क तोडला. याचा राग आल्याने गौरवने तिच्याकडे आधीच प्रश्न असल्याची माहिती सार्वजनिक केली, असे तपासाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.
या आरोपपत्रात २६ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेल्या पहिल्या सहा आरोपींची नावे आहेत. त्यापैकी तिघे एमपीएससीचे अधिकारी आहेत. आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात प्रश्नसंचाच्या ‘मेटा सेट’ची जबाबदारी नाकतेकडे होती. अंतिम प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या मुख्य साठ्याला ‘मेटा सेट’ म्हटले जाते. नाकतेने याच प्रश्नसंचातून प्रश्न मिळवून ते टाईप केल्याचा आरोप आहे.
आरोपपत्रात विश्वेश्वर नाकते, अभिजित लेंडवे आणि गोपाळ मराठे या एमपीएससी अधिकाऱ्यांसह मध्यस्थ प्रवीण पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील आणि गौरव पाटील यांचा समावेश आहे. ऋतुजाला सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ आरोपींना अटक झाली असून, आणखी दोन आरोपी फरार आहेत. सर्व अटक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित आरोपींविरुद्ध डिसेंबरमध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षकांच्या १५४ पदांसाठी २२ मार्च रोजी राज्यातील सहा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. १२ जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रिया मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचली होती. मात्र, परीक्षेनंतर सुमारे चार महिन्यांनी पेपरफुटीचे आरोप समोर आले. २१ जुलै रोजी गौरवने एमपीएससीला ईमेल पाठवून परीक्षेपूर्वीच प्रश्न फुटल्याचा दावा केला. त्यानंतर काही दिवसांनी त्याने दुसरा ईमेल पाठवून आपली तक्रार खोटी असल्याचे म्हटले. २७ जुलै रोजी आयोगाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात एका उमेदवाराला परीक्षेपूर्वीच प्रश्न उपलब्ध झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर २५ ऑगस्ट रोजी आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली.
भरती प्रक्रिया रद्द झाल्यानंतरही उमेदवारांचे आंदोलन सुरूच राहिले. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर विद्यार्थ्यांनी सलग ११ दिवस आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम सहभागी झाले होते.
ऑक्टोबरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती जाहीर केली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे या समितीचे सचिव आहेत. एमपीएससीच्या परीक्षांमधील पेपरफुटीच्या आरोपांची चौकशी करण्याबरोबरच आयोगाच्या कामकाजाचा, तसेच आजी-माजी अध्यक्ष आणि सदस्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार १२ ऑक्टोबरपासून रजेवर आहेत. पेपरफुटी जानेवारी महिन्यात झाली असून, आपण ३ मार्च रोजी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता, असे सांगत त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. पदापासून दूर राहण्याचा निर्णय कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दबावामुळे घेतलेला नसून तो स्वतःचा निर्णय असल्याचे त्यांनी त्यावेळी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते.