एसटीच्या एनसीएमसी कार्डधारकांना दिलासा; रिचार्जवरील कमिशन रद्द

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
मुंबई
ncmc card
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) योजनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. कार्ड रिचार्ज करताना आकारण्यात येणारे कमिशन रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, आता प्रवाशांना पाच रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार आहे. तसेच भीम ॲपद्वारेही कार्ड टॉपअप करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सवलतधारक प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार असून, रिचार्जची प्रक्रियाही अधिक सोयीची होणार आहे.



एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह पात्र सवलतधारकांना एनसीएमसी कार्ड रिचार्ज करणे आवश्यक असते. यापूर्वी कार्ड रिचार्ज करताना ११.८० रुपये कमिशन आकारले जात होते. त्यात विविध करांचाही समावेश असल्याने रिचार्ज केलेल्या एकूण रकमेतून ही रक्कम वजा होऊन उर्वरित पैसेच कार्डमध्ये जमा होत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सवलतधारकांच्या कार्ड रिचार्जवरील कमिशन रद्द केले आहे. त्यामुळे रिचार्जसाठी भरलेली रक्कम अधिक प्रमाणात कार्डमध्ये जमा होण्यास मदत होणार आहे. अधिकृत एजंट आणि वाहकांमार्फत टॉपअप करण्याची सुविधाही कायम राहणार आहे. मात्र, या व्यवहारांवर लागू असलेला कर आकारला जाणार असल्याचे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी बसचे भाडे तुलनेने कमी असल्याने अनेकदा कार्डमध्ये काही रक्कम शिल्लक राहत होती. पूर्वी रिचार्ज केवळ ५० रुपयांच्या पटीत करता येत असल्याने प्रवाशांना गरजेपेक्षा जास्त रक्कम भरावी लागत होती. परिणामी, कार्डमध्ये अनावश्यक पैसे अडकून राहत होते. ही अडचण दूर करण्यासाठी आता पाच रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना पाच, दहा, पंधरा, वीस रुपयांप्रमाणे आवश्यकतेनुसार रिचार्ज करता येणार आहे. वारंवार मोठी रक्कम भरण्याची गरज कमी होणार असल्याने विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा फायदा होईल.

एनसीएमसी कार्ड रिचार्जसाठी एसटी महामंडळाने भीम ॲपचाही पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या किंवा प्रवासादरम्यान मोबाईलवरून कार्ड रिचार्ज करता येणार आहे. याशिवाय एसटी बसमधील वाहक, बसस्थानकांवरील टॉपअप काउंटर आणि अधिकृत एजंटांमार्फतही रिचार्जची सुविधा सुरू राहणार आहे. रिचार्जवरील कमिशन रद्द करणे, कमी रकमेच्या टॉपअपला परवानगी आणि डिजिटल पेमेंटचा पर्याय अशा बदलांमुळे एनसीएमसी कार्डचा वापर अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.