बनावट नोटा देऊन किराणा व्यापाऱ्याची गुजरातमध्ये फसवणूक

४० लाखांच्या बदल्यात ‘चिल्ड्रन बँक’च्या नोटा!

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-businessman-40-lakh-fraudअसली नोटांच्या बदल्यात ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे छापलेले कागदाचे बंडल देऊन नागपूरच्या किराणा व्यापाऱ्याची गुजरातमध्ये ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचे धागेदोरे हवाला व्यवहाराशी जोडले असल्याचे समोर आले आहे. तहसील पोलिसांनी सापळा रचून टोळीतील एका आरोपीला नागपुरात अटक केली, तर त्याच्या दोन साथीदारांना गुजरातमध्ये पकडण्यात आले.
 

paisa 
हितेश केसवानी असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. लकडगंज परिसरात राहणारे केसवानी किराणा व्यापारात दलाली करतात. इतवारी येथे त्यांचे कार्यालय आहे. गुजरातमध्येही त्यांचे मोठ्या रकमेचे व्यवहार चालतात. १७ डिसेंबर २०२६ रोजी त्यांना गुजरातमधील उंझा येथे रोहितभाई नामक व्यावसायिकाला ४० लाख रुपये द्यायचे होते.
दरम्यान, १६ डिसेंबरला एका व्यक्तीने जय दुर्गा ट्रान्सफरचा मालक असल्याचे सांगत केसवानी यांच्याशी संपर्क साधला. संबंधित रक्कम पोहोचवून देण्याच्या बदल्यात किरकोळ कमिशन घेण्याची तयारी त्याने दर्शवली. त्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून केसवानी यांनी ४० लाख रुपये त्याच्याकडे दिले. तसेच रोहितभाई यांचा मोबाइल क्रमांकही दिला.
त्यानंतर उंझा येथील मिलन थिएटरजवळ एका व्यक्तीने रोहितभाई यांच्याकडे नोटांनी भरलेली बॅग सुपूर्द केली. घरी जाऊन बॅग उघडताच त्यांना धक्का बसला. बॅगेत असली नोटांऐवजी ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे छापलेले कागदाचे बंडल होते. रोहितभाईंनी याबाबत केसवानी यांना माहिती दिली. त्यानंतर तहसील पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.
मित्रालाही फसवण्याचा प्रयत्न
दरम्यान, केसवानी यांच्या एका मित्रालाही अशाच प्रकारचा फोन आला होता. त्याला अहमदाबाद येथे १० लाख रुपये पोहोचवायचे होते. केसवानी यांच्यासोबत घडलेल्या फसवणुकीची माहिती असल्याने मित्राने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी आखलेल्या योजनेनुसार, शनिवारी रात्री शहीद चौकात १० लाख रुपये घेण्यासाठी आलेल्या नीतेशकुमार संजीव शर्मा (३१, रा. बिकानेर, राजस्थान) याला तहसील पोलिसांनी सापळा रचून अटक केली.चौकशीत त्याने आपले दोन साथीदार अहमदाबादमध्ये असल्याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
फाटलेल्या नोटेचा क्रमांक ‘कोड’
फसवणुकीसाठी आरोपी चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे नियोजन करीत असल्याचे समोर आले आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात रक्कम पोहोचवताना समोरच्या व्यक्तीला फाटलेल्या नोटेचा क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांक ‘कोड’ म्हणून सांगितला जात असे. त्यानंतरच नोटांची देवाणघेवाण केली जात असल्याचे भासवले जाई. विश्वास संपादन करून समोरच्या व्यक्तीला जाळ्यात ओढण्यासाठी हा बनाव केला जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलिस करीत आहेत.