सव्वा दोन कोटींची गांजाची शेती उद्ध्वस्त

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
नाशिक
nashik ganja farm raid
गांजाच्या झाडांना फुले आणि बोंडे आल्यानंतर त्यांना बाजारात मोठी किंमत मिळते. महिनाभरात ही झाडे फुलोऱ्यावर येऊन विक्रीसाठी तयार होणार होती. मात्र, त्यापूर्वीच तालुका पोलीस, हरसूल पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांच्या गांजा लागवडीचा डाव उधळून लावला. विशेष म्हणजे, पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने कापून जमिनीत पुरलेला तब्बल १ हजार २१० किलो गांजासदृश मुद्देमाल जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून बाहेर काढण्यात आला.



या प्रकरणी संशयित वामन संतु गुंबाडे याला अटक करण्यात आली आहे. सोमवारी (दि. २३) न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नाईकवाडी शिवारातील दुर्गम डोंगराळ भागात चार एकर क्षेत्रावर वाल आणि टोमॅटोच्या पिकांच्या आड गांजाची बेकायदेशीर लागवड सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि. २१) रात्री आणि रविवारी (दि. २२) पहाटे संयुक्त पथकाने संबंधित शेतावर छापा टाकला. मात्र, पथक येण्याची चाहूल लागताच संशयिताने गांजाची सर्व झाडे कापून शेतात खड्डे खणून पुरून टाकली होती.

घटनास्थळी पोलिसांना केवळ कापलेल्या झाडांची मुळे आढळली. मात्र, मिळालेली माहिती खात्रीशीर असल्याने पथकाने परिसराची बारकाईने पाहणी सुरू ठेवली. जमिनीवरील माती भुसभुशीत असल्याचे लक्षात आल्यानंतर जेसीबीच्या मदतीने खोदकाम करण्यात आले. या वेळी सुरुवातीला ९८० किलो आणि त्यानंतर आणखी २३० किलो, असा एकूण १ हजार २१० किलो गांजासदृश मुद्देमाल बाहेर काढण्यात आला. त्याची किंमत सुमारे सव्वा दोन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे पिकअप वाहनही जप्त करण्यात आले.

मोठ्या साखळीचा सहभाग असल्याचा संशय

संबंधित शेतातील गांजाची झाडे चार ते सहा महिन्यांची होती. ती परिपक्व होण्याच्या टप्प्यावर असल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागवड करणे आणि त्यानंतर विक्रीसाठी ग्राहक शोधणे, हे एका व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचे असल्याने या प्रकरणामागे मोठी साखळी किंवा मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अटक झाल्यापासून वामन गुंबाडे तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. या लागवडीची कल्पना त्याला कोणी दिली, यासाठी आर्थिक गुंतवणूक कोणी केली आणि गांजाच्या विक्रीचे जाळे किती दूरवर पसरले होते, याचा तपास पोलीस निरीक्षक मृदुला नाईक करत आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर कारवायांवर लक्ष ठेवून शोधमोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.