प्रणव सातोकर
नागपूर,
neeri-nagpur-medicinal-plants-conservationऔषधी वनस्पतींचे संवर्धन, दुर्मिळ वनस्पतींचे जतन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने नागपुरातील सीएसआयआर-नीरी संस्थेने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला आहे. संस्थेच्या स्मृती वनात आयुर्वेदात महत्त्व असलेल्या सुमारे १०० प्रकारच्या औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या संग्रहात सात प्रकारच्या हळदींसह सर्पगंधा, कुटकी, गुग्गुळ, रुद्राक्ष आणि रक्तचंदन यांसारख्या दुर्मिळ व संकटग्रस्त वनस्पतींचाही समावेश आहे. दुसरीकडे, बांब्या वनामध्ये देशातील १०० बांबू प्रजातींचे जिवंत संवर्धन करण्यात आले असून, पर्यावरण पुनरुज्जीवनासाठी नीरीचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
स्मृती वनात औषधी वनस्पतींचा अनमोल खजिना
नीरीच्या स्मृती वनात औषधी वनस्पतींची समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते. आयुर्वेदात पारंपरिक औषधी उपयोगासाठी ओळखल्या जाणाऱ्या कडुनिंब, लवंग, अडुळसा, पिंपळी, पुदिना आणि क्रीप जिंजर यांसारख्या वनस्पती येथे जतन करण्यात आल्या आहेत. विशेष आकर्षण म्हणजे हळदीच्या सात वेगवेगळ्या प्रकारांचा संग्रह. या सर्व वनस्पती कर्क्युम या वंशातील आहेत.
याशिवाय इन्सुलिन प्लांटचाही या उद्यानात समावेश आहे. या वनस्पतीच्या पानांचा पारंपरिक पद्धतीने मधुमेहासाठी उपयोग केला जातो. मात्र, मानवी रक्तातील साखरेवर त्याचा नेमका परिणाम किती होतो, याबाबत वैज्ञानिक पुरावे अद्याप निश्चित नाहीत.
दुर्मिळ आणि संकटग्रस्त वनस्पतींचे विशेष जतन
स्मृती वनातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे दुर्मिळ आणि संकटग्रस्त औषधी वनस्पतींचे संवर्धन. सर्पगंधा, कुटकी, अगरवुड, गुग्गुळ, रुद्राक्ष आणि रक्तचंदन यांसारख्या वनस्पती येथे जतन करण्यात आल्या आहेत.
औषधी, पर्यावरणीय आणि जैवविविधतेच्या दृष्टीने या वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. जंगलतोड, अधिवासाचा ऱ्हास आणि अनियंत्रित संकलनामुळे अनेक वनस्पतींच्या अस्तित्वावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत या वनस्पतींचे जिवंत स्वरूपात संवर्धन करणे, त्यांची ओळख जपणे आणि भविष्यातील संशोधन व पुनरुत्पादनासाठी त्यांचे जतन करणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
बांबू वनात १०० प्रजातींचे संवर्धन
नीरीच्या बांबू वनात देशाच्या विविध भागांतून आणलेल्या बांबूच्या १०० प्रजातींचे संवर्धन करण्यात आले आहे. बांबूच्या या प्रजाती उंची, खोडाची जाडी, रंग, फांद्यांची रचना आणि बेटांच्या स्वरूपातील वाढ यानुसार वेगवेगळ्या आहेत. काही बांबूंची खोडे बारीक असतात, तर काहींची जाड आणि मजबूत असतात. या सर्व प्रजाती एकाच ठिकाणी पाहता येत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना त्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करता येतो.
नीरी ने बांबू आधारित इको-रिज्युव्हिनेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून देशभरातील औद्योगिक, खाण क्षेत्रातील आणि नापीक जमिनींवर हरित पट्टे विकसित करण्याचे काम केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर १,५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर करण्यात आला असून, १५ लाखांहून अधिक बांबूची रोपे लावण्यात आली आहेत.
बांबू वनातील विविध प्रजातींचा अभ्यास करून शेतकरी आपल्या जमिनीचा प्रकार, हवामान आणि गरजेनुसार योग्य बांबूची निवड करू शकतात. बांबूचा वापर शेतीतील विविध कामांसाठी, हस्तकला निर्मितीसाठी तसेच पूरक उत्पन्नाच्या साधनासाठी होऊ शकतो. योग्य लागवड, पाणी व्यवस्थापन आणि देखभाल केल्यास पडीक जमिनीवरही हिरवाई निर्माण करणे शक्य आहे.
स्मृती वन आणि बांबू वन हे केवळ वनस्पतींचे संग्रहस्थान नसून जैवविविधता संवर्धन, संशोधन, पर्यावरण शिक्षण आणि शाश्वत विकासाचे महत्त्वपूर्ण केंद्र बनत आहेत. औषधी वनस्पतींपासून दुर्मिळ वृक्षांपर्यंत आणि बांबूच्या विविध प्रजातींपासून औद्योगिक जमिनींच्या पुनरुज्जीवनापर्यंत नीरीचा हा उपक्रम नागपूरच्या पर्यावरणीय ओळखीला नवी दिशा देणारा ठरत आहे.
================================
स्मृती वनातील वनसंपदा केवळ औषधी वनस्पतींपुरती मर्यादित नाही. येथे सुमारे ३०० वनस्पतींचा संग्रह असून, त्यातील वृक्षांच्या संग्रहात ४१ कुळांमधील १०२ प्रजातींच्या १२३ प्रजातींची नोंद आहे.हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना मिळते.
- डाँ लाल सिंग, मुख्य वैज्ञानिक NEERI