काठमांडू
nepal earthquake today नेपाळच्या कोसी प्रांतातील लेलेप परिसरात मंगळवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेने (USGS) दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ इतकी होती. या भूकंपाचे हादरे भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि चीनच्या काही भागांमध्ये जाणवल्याचे वृत्त आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजून २ मिनिटांच्या सुमारास भूकंप झाला.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू २७.८५५ अंश उत्तर अक्षांश आणि ८७.९०९ अंश पूर्व रेखांशावर होता. जमिनीखाली सुमारे २० किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद झाली. मात्र, नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने या भूकंपाची तीव्रता ५.६ असल्याचे सांगितले. नेपाळ-तिबेट सीमेजवळील तापलेजुंग जिल्ह्यातील ओलांगचुंग गोला परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहितीही या केंद्राने दिली.
भूकंपाचे धक्के जाणवल्याने पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिहार, मेघालय आणि पश्चिम बंगालच्या काही भागांसह हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशांमध्येही हादरे जाणवले. पश्चिम बंगालमधील वृत्तानुसार, भूकंपामुळे उंच इमारती, निवासी घरे, विजेचे खांब आणि विद्युत तारांना हादरे बसले. अचानक जमीन हादरू लागल्याने घाबरलेल्या नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली. अनेक जण रस्त्यांवर जमा झाले.
सकाळी फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनाही भूकंपाच्या धक्क्यांचा अनुभव आला. उत्तर बंगालमधील जलपाईगुडी, अलीपूरद्वार आणि कूचबिहार या भागांतही हादरे जाणवले. मात्र, उपलब्ध माहितीनुसार, या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात मंगळवारी पहाटे आणखी एका भूकंपाची नोंद झाली. पहाटे ३ वाजून ३९ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर स्केल इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू २५.७४३ अंश उत्तर अक्षांश आणि ९३.३५५ अंश पूर्व रेखांशावर होता. जमिनीखाली १५ किलोमीटर खोलीवर या भूकंपाची नोंद झाली. नेपाळमधील भूकंपापूर्वी काही तास आधी झालेला हा स्वतंत्र भूकंप असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.