कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
नाशिक
onion farmers
राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. पेरणी केलेली पिके पाण्याअभावी करपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हाताशी आलेल्या उर्वरित पिकांना तरी बाजारात चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, कांद्याच्या बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. कांद्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.





देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी आणि पुरवठा यांच्यातील असमतोलामुळे दरांवर दबाव निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भाव घसरत असल्याचे चित्र आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. पाकिस्तानी कांद्याच्या कमी दरातील उपलब्धतेमुळे निर्यात व्यवहारांना मर्यादा येत असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारभावावर होत असल्याचे निर्यातदार व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

लासलगाव बाजार समितीतील ताज्या व्यवहारांमध्ये कांद्याच्या दरातील घसरण स्पष्टपणे दिसून आली. गेल्या मंगळवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ५ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला होता. मात्र, त्यानंतर दरात घसरण होऊन तो ४ हजार ८७१ रुपयांपर्यंत खाली आल्याचे चित्र आहे. बाजार समितीत विक्रीसाठी लाल कांद्याची सुमारे ३५३ वाहनांमधून आवक झाली होती. या कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ४ हजार ८६१ रुपये, तर किमान १ हजार ५०० रुपये भाव मिळाला. सरासरी बाजारभाव प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान राहिला.

अवघ्या आठवडाभरात कांद्याच्या दरात जवळपास ९०० रुपयांची घट झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. यंदा अनेक भागांत पाण्याची टंचाई असल्याने कांद्याचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरद्वारे पाणी आणून सिंचन करावे लागले. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. एकीकडे पिकांच्या संगोपनासाठी अधिक खर्च करावा लागला, तर दुसरीकडे बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चाची भरपाई करणेही कठीण बनले आहे.दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन सरकारकडून दिले जात असले, तरी प्रत्यक्ष बाजारपेठेतील परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी कायम आहेत. आधीच पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक गणित कोलमडले असताना, हाताशी आलेल्या कांद्यालाही समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने कांद्याच्या बाजारभावातील घसरण रोखण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा आणि कांदा उत्पादकांना आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.