पोलिसांच्या फिटनेसला ‘प्रहार’ची साथ!

क्रिकेट टर्फचे उद्घाटन; पोलिस फिटनेस सेंटरचे नूतनीकरण

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
prahar extends नागपूर पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांच्या क्रीडा कौशल्याला व शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘प्रहार’ क्रिकेट टर्फचे उद्घाटन आणि पोलिस मुख्यालयातील फिटनेस सेंटरच्या नूतनीकरणाचा समारंभ सोमवारी उत्साहात पार पडला. महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या दोन्ही सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.

prahar extends 
 
 
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून सीआयडी कार्यालयाच्या बाजूला ‘प्रहार’ क्रिकेट टर्फ उभारण्यात आले आहे. तसेच, पोलिस मुख्यालय परिसरातील फिटनेस सेंटरचे नूतनीकरण करून ते आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते क्रिकेट टर्फचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पोलिस फिटनेस सेंटरच्या नूतनीकरणाचा समारंभ दीपप्रज्वलनाने पार पडला. यावेळी १० ते १२ वर्षे वयोगटातील क्रिकेटपटूंना क्रिकेट किटचे वितरणही करण्यात आले. या उपक्रमामुळे पोलिस अधिकारी व अंमलदारांना क्रिकेटच्या माध्यमातून आपले क्रीडा कौशल्य विकसित करण्याची, तसेच आधुनिक उपकरणांनी सुसज्ज फिटनेस सेंटरच्या मदतीने शारीरिक तंदुरुस्ती राखण्याची संधी मिळणार आहे. सुदृढ शरीर, निरोगी मन आणि उत्तम शारीरिक क्षमता हे प्रभावी पोलिस कार्यप्रणालीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. या दृष्टिकोनातून पोलिस दलात आरोग्य आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त विनिता शाहू (उत्तर प्रभाग), राजेंद्र दाभाडे (गुन्हे) आणि पोलिस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.