मराठी रंगभूमीचा ‘धुरंधर’ आता हिंदी सिनेमात झळकणार

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
मुंबई
prasad oak
मराठी नाटक, चित्रपट आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारा अभिनेता प्रसाद ओक आता हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनयाच्या जोरावर मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या प्रसादच्या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘सायबर – द बिगिनिंग’ असे या चित्रपटाचे नाव असून, यामध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. मात्र, त्याची नेमकी भूमिका काय असेल, याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे प्रसादच्या हिंदी चित्रपटातील नव्या भूमिकेविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.



प्रसाद ओक याने मराठी मनोरंजनसृष्टीत अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही आघाड्यांवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘फर्जंद’, ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘स्माईल प्लीज’, ‘धुरळा’ आणि ‘पिकासो’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने अभिनयातील विविध छटा प्रभावीपणे साकारल्या. मात्र, ‘धर्मवीर’ चित्रपटातील दिवंगत आनंद दिघे यांची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील विशेष लक्षवेधी ठरली. या भूमिकेतील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती.

अभिनयाबरोबरच दिग्दर्शन क्षेत्रातही प्रसादने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान मिळाला होता. याशिवाय ‘हिरकणी’ आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांचेही त्याने दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांतील अनुभवाच्या जोरावर आता तो हिंदी चित्रपटसृष्टीत आपली नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

‘सायबर – द बिगिनिंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आलोक नाईक करत असून, राज झकेरियास यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. प्रसाद ओक याच्यासोबत या चित्रपटात झैन खान दुर्रानी, ‘तारे जमीन पर’मधून प्रसिद्ध झालेला दर्शील सफारी, कबीर दुहान सिंग, राहुल सिंह, आलीशा खान, आयुष त्यागी, सौम्या श्रीवास्तव, अजित कोश्य आणि विठ्ठल काळे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाला गोपी सुंदर यांनी संगीत दिले असून, अनिरुद्ध चॅटर्जी यांनी पटकथा लिहिली आहे.

‘सायबर – द बिगिनिंग’ हा वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, चित्रपटातील प्रसाद ओकच्या व्यक्तिरेखेबाबत अद्याप पडदा कायम आहे. मराठी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने प्रभावित करणारा हा अभिनेता हिंदी चित्रपटात कोणत्या भूमिकेत आणि कोणत्या वेगळ्या अंदाजात दिसणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे प्रसादच्या बॉलिवूडमधील या नव्या प्रवासाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.