priyansh-arya-New-Record सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026-27 मध्ये प्रियांश आर्यच्या बॅटने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. दिल्लीचा कर्णधार असलेल्या प्रियांशने तामिळनाडूविरुद्ध अशी काही वादळी खेळी केली की, टी-20 क्रिकेटच्या इतिहासात त्याच्या नावाची नोंद झाली. अवघ्या 68 चेंडूंमध्ये 19 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने त्याने तब्बल 181 धावा ठोकल्या. या खेळीसह त्याने ख्रिस गेलचा तब्बल 13 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
मंगळवारी इंदूरच्या डेली कॉलेज मैदानावर दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील एलिट ग्रुप बी चा सामना रंगला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार प्रियांश आर्यने तुफानी फलंदाजी करत तामिळनाडूच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. प्रियांशने अवघ्या 36 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याची फटकेबाजी थांबली नाही. त्याने 68 चेंडूंचा सामना करत 19 षटकार आणि 7 चौकारांसह 181 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.
यापूर्वी एप्रिल 2013 मध्ये ख्रिस गेलने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी केली होती. मात्र, आता प्रियांशने 181 धावा करत गेलचा हा विक्रम मागे टाकला आहे. टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या लुआन-ड्रे प्रिटोरियसच्या नावावर आहे.
प्रियांश आर्यने केवळ धावांचा विक्रमच मोडला नाही, तर षटकारांचा पाऊस पाडत आणखी एक मोठा पराक्रम केला. त्याने आपल्या खेळीत तब्बल 19 षटकार ठोकले. यासह टी-20 क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. न्यूझीलंडचा फलंदाज फिन ॲलन याने वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून खेळताना 19 षटकार मारले होते. आता प्रियांशनेही त्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.