डेंटल कॉलेजमध्ये रॅगिंग : विद्यार्थ्यांला मुलींचे कपडे घालून फिरवले

- उष्टे अन्न खायला लावल्याचा आरोप; अजनी पोलिसांत चार विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
ragging at dental college शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या वसतिगृहातील रॅगिंगचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे कपडे काढून त्यांना महिलांचे कपडे घालण्यास आणि मेसमधील उष्टे अन्न खाण्यास भाग पाडले. या प्रकरणी अजनी पोलिसांनी चार विद्यार्थ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ragging at dental college 
 
 
एम. हसनान हा १९ वर्षीय विद्यार्थी उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्याचा रहिवासी असून, तो शासकीय दंत महाविद्यालयात दंतशल्यचिकित्सेच्या (बीडीएस) प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, २६ ते २७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली क्रमांक १०४ आणि मेसमध्ये हा प्रकार घडला. आयुष सी. आर., नरेंद्र सिंह, अमन खान आणि अन्य एका अज्ञात विद्यार्थ्याने हसनान व त्याचे मित्र तेजस आणि रोशन यांना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. ‘आमचे ऐकले नाही तर कॉलेजमध्ये शिक्षण घेता येणार नाही. महाविद्यालयात शिक्षण सुरू ठेवायचे असेल, तर वरिष्ठांच्या सांगण्यानुसार वागावे लागेल, अशी धमकी आरोपींनी नवोदित विद्यार्थ्यांना दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर तिघांना कपडे काढण्यास, मान खाली घालून ‘कोंबडा’ होण्याच्या अपमानास्पद स्थितीत बसण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांना मुलींचे कपडे घालण्यास आणि मेसमधील उरलेले अन्न खाण्यास भाग पाडण्यात आले. यावेळी त्यांना शिवीगाळ करून धमकावल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.ragging at dental college या प्रकारानंतर हसनानने अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे.