मुंबई
ramayana box office collection दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप कायम आहे. प्रदर्शनाला १९ दिवस पूर्ण झाले असतानाही रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही. अवघ्या १९ दिवसांत चित्रपटाने जगभरात १ हजार ७०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या कामगिरीसह अनेक मोठ्या चित्रपटांचे विक्रम मागे टाकण्यात त्याला यश आले आहे. विशेष म्हणजे, सोमवारी चित्रपटाच्या कमाईत रविवारीच्या तुलनेत मोठी घट झाली असली, तरी जागतिक स्तरावर त्याने दमदार कामगिरी नोंदवली आहे. भारतातील चित्रपटाची निव्वळ कमाईही ९५५ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.

व्यापारविषयक आकडेवारी देणाऱ्या सॅकनिल्कच्या अहवालानुसार, प्रदर्शनाच्या १९व्या दिवशी म्हणजेच सोमवारी 'रामायण'ने भारतात १२.७० कोटी रुपयांचा निव्वळ गल्ला जमवला. यासह देशांतर्गत एकूण निव्वळ कमाई ९५५.४५ कोटी रुपयांवर पोहोचली असून, एकूण ग्रॉस कलेक्शन १ हजार १४१.६५ कोटी रुपये झाले आहे. भाषानिहाय कमाईचा विचार करता, सोमवारी हिंदी आवृत्तीने सर्वाधिक ९.२५ कोटी रुपयांची कमाई केली. मल्याळम आवृत्तीला १.५० कोटी, कन्नडला ८५ लाख, तमिळला ८० लाख, तर तेलुगू आवृत्तीला ३० लाख रुपये मिळाले. यापूर्वी रविवारी, म्हणजेच प्रदर्शनाच्या १८व्या दिवशी चित्रपटाने ३५.६० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे रविवारच्या तुलनेत सोमवारी चित्रपटाच्या कमाईत तब्बल ६२ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.
जागतिक कमाईच्या बाबतीतही 'रामायण'ने मोठी झेप घेतली आहे. भारताबाहेरील बाजारपेठांमध्ये चित्रपटाने आतापर्यंत ५६३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशांतर्गत आणि परदेशातील व्यवसाय मिळून चित्रपटाचे जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन १ हजार ७०४.६५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आता या चित्रपटाचे पुढील लक्ष्य अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा विक्रम मोडण्याचे आहे. 'पुष्पा २'ने जगभरात १ हजार ७४२ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे 'रामायण'ला हा आकडा गाठण्यासाठी आणखी किती दिवस लागतात, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चे वर्चस्व कायम असताना धनुष आणि मामूट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'ओम : ऑपरेशन मोल' या चित्रपटानेही चांगली कामगिरी केली आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात ९३.४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी या चित्रपटाने ६.२० कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये तमिळ भाषेतील आवृत्तीचा सर्वाधिक वाटा असून, तिने ४.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
दुसरीकडे, हॉलिवूडचा 'गॉडझिला मायनस झिरो' हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर मात्र अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने भारतीय बाजारपेठेत केवळ ३३ लाख रुपयांची कमाई केली. त्यामुळे सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर 'रामायण' आणि 'ओम : ऑपरेशन मोल' यांच्यातील कमाईची चर्चा रंगत असताना हॉलिवूडच्या या चित्रपटाला मात्र संघर्ष करावा लागत आहे.