सलमानच्या 'मदिरापान' गाण्याचा पडद्यामागचा धमाका

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
मुंबई
salman khan
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'मातृभूमी : मे वॉर रेस्ट इन पीस' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याच्या प्रदर्शनाची चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, चित्रपटातील 'मदिरापान' या नव्या गाण्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत त्याला १ कोटी ६० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या यशामुळे उत्साहित झालेल्या निर्मात्यांनी आता या गाण्याच्या निर्मितीप्रक्रियेचा खास पडद्यामागील (बीटीएस) व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.



या व्हिडिओमध्ये गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान घडलेले मजेशीर प्रसंग, कलाकारांची ऊर्जा आणि संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत पाहायला मिळते. सलमान खान आपल्या खास शैलीत डान्स फ्लोअरवर थिरकताना दिसत आहे. त्याच्या सिग्नेचर स्वॅगसह सादर केलेल्या जोशपूर्ण डान्स मूव्ह्सने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्री चित्रांगदा सिंहही या व्हिडिओमध्ये दिसत असून, आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने आणि सहजसुंदर नृत्यशैलीने तिने गाण्यात वेगळीच रंगत आणल्याचे पाहायला मिळते.

गाण्याच्या चित्रीकरणासाठी कलाकार आणि तंत्रज्ञांनी किती मेहनत घेतली, याची झलकही या व्हिडिओतून समोर आली आहे. डान्सच्या प्रत्येक दृश्यात अचूकता आणि प्रभाव निर्माण करण्यासाठी दीर्घकाळ चाललेली रंगीत तालीम, नृत्याच्या हालचालींचा सराव आणि सेटवरील तयारी यांचे चित्रण करण्यात आले आहे. पडद्यावर दिसणाऱ्या आकर्षक नृत्याविष्कारामागे संपूर्ण टीमचे नियोजन, समन्वय आणि परिश्रम असल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होते.

'मदिरापान' या गाण्याला salman khan संगीतकार हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केले असून, समीर अंजान यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. जावेद अली, मोहम्मद दानिश आणि सौमी सैलेश यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच हे गाणे संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरले आहे. त्यातील ठेका धरायला लावणारे संगीत, जोशपूर्ण ताल आणि सैनिकांच्या जल्लोषपूर्ण उत्सवाची पार्श्वभूमी यामुळे गाण्याला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. आता बीटीएस व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना गाण्याच्या निर्मितीमागील मेहनत, कलाकारांमधील समन्वय आणि चित्रीकरणातील काही अविस्मरणीय क्षण अनुभवता येणार आहेत.दरम्यान, अपूर्व लाखिया दिग्दर्शित 'मातृभूमी : मे वॉर रेस्ट इन पीस' हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान खान फिल्म्स या निर्मिती संस्थेच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख यापूर्वी अनेकदा बदलण्यात आली आहे. सुरुवातीला हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर १७ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचे नियोजन होते. मात्र, काही कारणांमुळे निर्मात्यांनी प्रदर्शन पुढे ढकलले. त्यानंतर २० नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, अखेरीस आता ४ डिसेंबर रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना गाण्याला मिळणारा प्रतिसाद आणि नव्याने प्रदर्शित झालेला पडद्यामागील व्हिडिओ यामुळे सलमानच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.