तुकाराम मुंढेंचा FDA अ‍ॅक्शन मोडमध्ये

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
पुणे
tukaram mundhe
अन्नपदार्थांमधील भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर कारवाईचा धडाका लावला आहे. तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाईच्या मोहिमांना वेग आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालकांसह भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध रूपाली आणि वैशाली हॉटेलमधील अस्वच्छतेचा प्रकार समोर आल्यानंतर आता प्रशासनाने पिंपरी-चिंचवडमधील खाद्य व्यावसायिकांकडे मोर्चा वळवला आहे. पिंपळे सौदागर आणि वाकडसह विविध भागांतील नऊ हॉटेल्सवर एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे.





पुणेकरांकडून स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळण्याच्या अपेक्षेने पसंती दिल्या जाणाऱ्या प्रसिद्ध रूपाली आणि वैशाली हॉटेलमधील अस्वच्छतेचे प्रकार एफडीएच्या तपासणीत उघड झाले होते. या प्रकरणानंतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेतल्याचे दिसत आहे. आता सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत २० आणि २१ नोव्हेंबर रोजी पुणे तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील एकूण ९६ खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळलेल्या चार आस्थापनांची नोंदणी निलंबित करण्यात आली, तर आवश्यक नोंदणी नसतानाही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या पाच आस्थापनांना थेट कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

या मोहिमेत पिंपळे सौदागर, वाकड आणि परिसरातील खाद्य व्यावसायिकांवर विशेष कारवाई करण्यात आली. अनाया फॅमिली रेस्टॉरंट, लिटिल बिस्ट्रो बाय लिटिल दिल्ली, फन फूड अ टेस्ट ऑफ इंदोर, न्यू पूना बेकरी आणि विजय वडेवाला या पिंपळे सौदागरमधील आस्थापनांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे. वाकडमधील श्रीराम वडनाव, बिस्मिल्लाह केटरर्स आणि अप्पा इडली यांच्यावरही एफडीएने कारवाई केली. याशिवाय तळवडे येथील हॉटेल समर्थ व्हेजवरही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. या धडक मोहिमेमुळे परिसरातील हॉटेल आणि खाद्य व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, एफडीएची कारवाई केवळ हॉटेल आणि खाद्यपदार्थांपुरती मर्यादित राहिलेली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) औषध भांडारात निकृष्ट दर्जाची आणि संशयास्पद औषधे आढळल्याने प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. रुग्णालयाच्या गोदामातून सुमारे १ कोटी ७२ लाख रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जेजुरी येथील औषध उत्पादक कंपनीतून १७ लाख रुपयांचा औषधसाठाही ताब्यात घेण्यात आला आहे.

संबंधित कंपनीने वैध उत्पादन परवानगी नसताना औषधांचे उत्पादन आणि पुरवठा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, जप्त केलेल्या औषधांच्या किमतीवरून आता वेगळीच माहिती समोर आली आहे. एफडीएकडून जप्त औषधसाठ्याचे मूल्य १ कोटी ७२ लाख रुपये सांगण्यात आले असले, तरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी हा आकडा फेटाळला आहे. जप्त औषधांची प्रत्यक्ष किंमत १ कोटी ७२ लाख रुपये नसून केवळ ११ लाख ९५ हजार रुपये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

एकीकडे शहरातील हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या स्वच्छतेचा प्रश्न, तर दुसरीकडे रुग्णालयात पुरवठा होणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेबाबत गंभीर बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे एफडीएच्या या कारवायांकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, अन्न आणि औषधांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून पुढे कोणती पावले उचलली जातात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.