शाळेची सहल ठरली मृत्यूची 'सफर'

जखमींवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार; चार मुलांचा मृत्यू

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |

उत्तर प्रदेश,
up-school-bus-accidentएक्सप्रेस वेच्या कडेला उभ्या असलेल्या एका स्कूल बसला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक मुलं जखमी झाली आहेत. अपघाताच्या वेळी या बसमध्ये एकूण ५० विद्यार्थी आणि ६ शिक्षक प्रवास करत होते. या घटनेमुळे सर्वत्र तीव्र शोककळा पसरली आहे. हा अपघात उत्तर प्रदेशातील आगरा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर घडली.
 

up bus accident 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सहलीसाठी गेले होते आणि ती बस आग्र्याहून कौशाम्बीच्या दिशेने जात होती. कन्नौज जिल्ह्यातील ठठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक्सप्रेसवेवरील २०९ किलोमीटर अंतराजवळ ही स्कूल बस उभी असताना भरधाव ट्रकने तिला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चार विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केलं. अपघातातील सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने नजीकच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तसेच, घटनेचं गांभीर्य लक्षात घेता कन्नौजचे जिल्हाधिकारी आशुतोष मोहन अग्निहोत्री आणि पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.