दोहा
vaibhav sooryavanshi वय अवघे १५ वर्षे; पण कामगिरी मात्र दिग्गज फलंदाजांनाही थक्क करणारी! भारतीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या (यूएई) सामन्यात त्याने केवळ २८ चेंडूंत शतक पूर्ण केले. यासह ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेक फ्रेजर-मॅकगर्क याचा सर्वांत जलद शतकाचा विक्रम मोडीत काढत वैभवने जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव कोरले.

दोहा येथे सुरू असलेल्या एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेतील अकराव्या सामन्यात वैभवने यूएईच्या गोलंदाजांवर अक्षरशः हल्ला चढवला. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत त्याने अवघ्या २८ चेंडूंत शतकाचा टप्पा गाठला. यापूर्वी लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वांत जलद शतकाचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या जेक फ्रेजर-मॅकगर्कच्या नावावर होता. त्याने दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना तस्मानियाविरुद्ध २९ चेंडूंत शतक झळकावले होते. वैभवने एक चेंडू कमी खेळून हा विक्रम आपल्या नावावर केला.
लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वांत जलद शतकांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ३१ चेंडूंत शतक पूर्ण केले होते. भारताच्या साकिबुल गनीने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ३२ चेंडूंत, तर ईशान किशनने कर्नाटकविरुद्ध ३३ चेंडूंत शतक झळकावले आहे. या यादीत आता वैभवने अव्वल स्थान पटकावले असून, त्याच्या ऐतिहासिक खेळीची क्रिकेटविश्वात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या यूएईने भारत अ संघासमोर २५० धावांचे लक्ष्य ठेवले. यूएईची सुरुवात अडखळती झाली. अवघ्या २० धावांवर संघाने दोन विकेट गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या भारतीय वंशाच्या हरप्रीत सिंह भाटियाने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचा सुरेख मेळ साधत शतक झळकावले आणि संघाला सावरले.
हरप्रीतने १४४ चेंडूंत १३० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १२ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. त्याने मोहम्मद शाहदादसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची, तर एथन डिसूझासोबत चौथ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार बेसिल हमीदसोबत ६६ धावा जोडत यूएईला २४९ धावांपर्यंत पोहोचवले. बेसिल हमीद ३६ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून अरशद खानने प्रभावी गोलंदाजी करत ४३ धावांत चार विकेट घेतल्या.
एका बाजूला यूएईच्या हरप्रीत भाटियाने शतकी खेळीच्या जोरावर संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली, तर दुसरीकडे वैभव सूर्यवंशीने विक्रमी शतक झळकावत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये विश्वविक्रम करणाऱ्या वैभवची ही कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी विशेष ठरली आहे.