मौदा,
hunger-strike-against-ntpc एनटीपीसी मौदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली १२ प्रकल्पग्रस्त युवकांनी २० नोव्हेंबरपासून अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारकांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी, कुंभारी गावाचे पुनर्वसन करावे आणि मौदा तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
एनटीपीसी प्रशासनाला २५ नोव्हेंबरपर्यंत मागण्यांवर निर्णय घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आता या आंदोलनाला महिलांचाही पाठिंबा मिळत असून धामणगाव-कुंभारी परिसरातील २५ ते ५० महिला उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
प्रकल्पग्रस्त युवकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही अनेकदा आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात नोकरीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. ज्या युवकांचे वय त्यावेळी २५ वर्षे होते, त्यांचे वय आता ४० वर्षांपर्यंत पोहोचले आहे. आणखी किती वर्षे प्रतीक्षा करायची? साठ वर्षांचे झाल्यानंतर नोकरी करायची काय, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. एनटीपीसी प्रशासनाकडून केवळ प्रस्ताव दिल्लीला पाठविल्याचे उत्तर दिले जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. यापूर्वी २०२३ मध्येही याच मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आश्वासने देण्यात आली; मात्र प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल आमदार कृपाल तुमाने, माजी आमदार टेकचंद सावरकर यांनीहीआंदोलकांची भेट घेऊन मागण्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनाचे नेतृत्व आणि मौदा नगराध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ राजा तिडके करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आता ठोस निर्णय होणार की पुन्हा आश्वासनांवरच आंदोलनाची सांगता होणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.