शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण
सेलू,
a-leopard-appeared-right-across-the-road तालुक्यातील ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सेलू ते हिंगणी मार्गावरील किन्ही ते जखाळा शिवारात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ मंगळवार २४ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बिबट्या अचानक रस्त्यावर आडवा आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपाचे सेलू तालुका महामंत्री विकास मोटमवार हे हिंगणी येथून सेलूकडे येत असताना त्यांना रस्त्यावरून बिबट्या जाताना दिसला. अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने काही वेळ ते रस्त्यावरच थांबले. बिबट्याने रस्त्यावरून लगतच्या शेत शिवाराच्या दिशेने निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वन्यप्राणी पाणी आणि शिकारीच्या शोधात गावाच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन्यजीव-मानव संघर्ष पेटण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
सध्या रबी हंगामातील शेतीची कामे सुरू असून अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जातात. अशा परिस्थितीत रस्त्यावरच बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेषतः किन्ही, जखाळा आणि परिसरातील शेतशिवारात काम करणार्या शेतकर्यांमध्ये भीती पसरली आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. तसेच नागरिक व शेतकर्यांना सतर्कतेचा इशारा देऊन आवश्यक उपाययोजना कराव्या, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांकडून होत आहे.
जाखळा शिवारात ओलिताची शेती आहे. या शेतशिवारात केळीचे पीक घेतले जाते. गत काही वर्षांपासून या शिवारात बिबट्याचा वावर आहे. या शिवाराला लागून बोर नदी आहे. पण, बिबट रस्त्यावरून आडवा गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.