अंकिता लोखंडेची थेट झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
मुंबई
ankita lokhande
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘पवित्र रिश्ता’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अंकिता आता झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे. तिच्या या नव्या एन्ट्रीमुळे मराठी मनोरंजनविश्वात चर्चांना उधाण आले असून, प्रेक्षकांची उत्सुकताही वाढली आहे. विशेष म्हणजे, या निमित्ताने अंकिता पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.



झी मराठी वाहिनीवरील ‘येतेच आता मी नांदायला’ या मालिकेच्या नव्या प्रोमोमधून अंकिताची झलक समोर आली आहे. वाहिनीने सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर केला असून, त्यामध्ये अंकिता अर्चना अर्थात अर्चू या भूमिकेत दिसत आहे. प्रोमोमध्ये ती डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी नळावर आलेली पाहायला मिळते. त्याचवेळी मालिकेतील ठकुबाईची भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी यांची एन्ट्री होते. अंकिताला पाहताच ठकुबाई, ‘ही कोण नटमोगरी... आमच्या इथे पाणी भरायला आलीये,’ असा सवाल करते. त्यावर अंकिता ‘मी अर्चू... अर्चना,’ असे उत्तर देते. या छोट्याशा संवादामुळे प्रोमोची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांचे यापूर्वीही छोट्या पडद्यावर एकत्र काम करण्याचे नाते राहिले आहे. हिंदीतील लोकप्रिय ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत दोघींनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेमुळे अंकिताला मोठी लोकप्रियता मिळाली, तर उषा नाडकर्णी यांच्या अभिनयाचेही प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. आता अनेक वर्षांनंतर या दोघी पुन्हा एकदा एकाच मालिकेत दिसणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी ही विशेष पर्वणी ठरणार आहे.

झी मराठीने प्रोमोसोबत दिलेल्या कॅप्शननेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ‘आधी नांदलेली सून आता परत येणार, ठकुबाईच्या ठसक्यासमोर तिचा निभाव लागणार का?’ असा प्रश्न वाहिनीने उपस्थित केला आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकात अर्चनाच्या आगमनानंतर कोणते नवे वळण येणार, ठकुबाई आणि तिच्यात कसा सामना रंगणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अंकिताची ही एन्ट्री मालिकेच्या प्रमोशनचा भाग असून, तिच्या उपस्थितीमुळे मालिकेला नवी रंगत मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ‘येतेच आता मी नांदायला’ ही मालिका ३० नोव्हेंबरपासून रात्री १० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिका साकारत आहे. आता अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांची पुन्हा एकत्र येणारी जोडी, अर्चूचे आगमन आणि ठकुबाईचा ठसका यामुळे नव्या मालिकेच्या चर्चांना अधिकच रंग चढला आहे.