मुंबई
Budget आर्थिक संकटाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या आगामी २०२७-२८ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे. मात्र, या अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे अंदाज आणि त्यामागील गृहीतकांवरून आता वाद निर्माण झाला आहे. तब्बल १ हजार ३१७ कोटी ५० लाख रुपयांची तूट असलेल्या या अर्थसंकल्पात भविष्यात मोठ्या संख्येने बसगाड्या ताफ्यात दाखल होतील आणि त्यातून उत्पन्नात वाढ होईल, असे गणित मांडण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष बसगाड्यांचा पुरवठाच वेळेत होत नसताना या अपेक्षांवर आधारित आर्थिक नियोजन कितपत वास्तववादी आहे, असा प्रश्न समिती सदस्यांनी उपस्थित केला. दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.

बेस्टच्या आर्थिक स्थितीचा विचार करता अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे आकडे वस्तुस्थितीशी कितपत जुळणारे आहेत, याबाबत ज्येष्ठ समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असे करत प्रशासनाच्या आर्थिक नियोजनावर टीका केली. अर्थसंकल्पाचे मुंबई महापालिकेकडून लेखापरीक्षण झालेले नसताना त्यातील उत्पन्नाच्या अंदाजांवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर बसगाड्या उपलब्ध होतील, प्रवाशांची संख्या वाढेल आणि परिणामी तिकीट विक्रीतून मिळणारा महसूलही वाढेल, असे गृहीत धरून अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. मात्र, कागदावर उपलब्ध असलेल्या बसगाड्या आणि प्रत्यक्ष रस्त्यावर धावणाऱ्या बसगाड्या यांमध्ये मोठा फरक असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
चालू आर्थिक वर्षात सुमारे तीन हजार बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात निर्धारित संख्येच्या तुलनेत सुमारे ६०० बसगाड्यांची कमतरता राहिली आहे. आधीच बसगाड्यांच्या पुरवठ्यात विलंब होत असताना आगामी आर्थिक वर्षात आणखी पाच हजार बसगाड्या उपलब्ध होतील, असे गृहीत धरण्यात आले आहे. संबंधित कंपन्यांकडून यापूर्वी झालेल्या विलंबाचा अनुभव पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसगाड्या नियोजित वेळेत ताफ्यात दाखल होणार का, असा प्रश्न गणाचार्य यांनी उपस्थित केला.
बेस्टच्या उत्पन्नवाढीचा मुख्य आधार प्रवासी संख्या आणि तिकीट विक्री हा आहे. मात्र, आवश्यक तेवढ्या बसगाड्याच उपलब्ध नसतील, तर प्रवाशांची संख्या वाढणार कशी आणि त्यातून अपेक्षित महसूल मिळणार तरी कसा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. केवळ भविष्यातील शक्यतांवर विसंबून उत्पन्नाचे आकडे वाढवणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्ष उपलब्ध बसगाड्या, मनुष्यबळ, बस परिचालनासाठी होणारा खर्च आणि मिळणारे वास्तविक उत्पन्न यांचा योग्य ताळमेळ साधूनच आर्थिक आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे गणाचार्य यांनी नमूद केले.
दरम्यान, बसगाड्यांच्या पुरवठ्यातील विलंब आणि आगामी नियोजनाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांना बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी उत्तर दिले. वेटलिस्टमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार संबंधित कंपन्यांना निश्चित मुदतीत बसगाड्यांचा पुरवठा करणे बंधनकारक आहे. करारात ठरवून दिलेल्या वेळेत बसगाड्या उपलब्ध न करून दिल्यास त्यातील अटींनुसार संबंधित कंपन्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सेठी यांनी दिला.
या बैठकीत सदस्य रमाकांत गुप्ता यांनी बेस्टच्या सेवा विस्तारासह कर्मचारी धोरण, सुरक्षितता आणि बसगाड्यांच्या दर्जाबाबत विविध सूचना मांडल्या. खारघर आणि पनवेल परिसरात बेस्टची बससेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर नाशिक कुंभमेळा, अयोध्या, काशी विश्वनाथ आणि उज्जैन या धार्मिक स्थळांसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली. बेस्टच्या २०१२ मधील भरती धोरणात बदल करून नव्या कर्मचाऱ्यांनाही रोजगाराची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पदोन्नती देताना केवळ सेवाज्येष्ठतेचा निकष न ठेवता इतर पात्रतांचाही विचार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.बेस्टने शून्य अपघातांचे उद्दिष्ट निश्चित करून त्या दिशेने ठोस उपाययोजना कराव्यात, चालकांचे प्रशिक्षण अधिक कठोर आणि प्रभावी करावे, तसेच बेस्टच्या ताफ्यातील बसगाड्यांचा दर्जा जागतिक स्तराचा असावा, अशा सूचनाही गुप्ता यांनी केल्या. एकीकडे मोठ्या तुटीचा अर्थसंकल्प आणि दुसरीकडे भविष्यातील बसगाड्यांच्या उपलब्धतेवर आधारित उत्पन्नवाढीचे नियोजन, यामुळे बेस्टच्या आर्थिक आराखड्याच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता स्थायी समितीच्या बैठकीत या अर्थसंकल्पावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.