नवी दिल्ली,
bumrah-makes-a-big-leap आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर जाहीर झालेल्या या क्रमवारीत कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांच्या स्थानात मोठी सुधारणा झाली आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही गोलंदाजांच्या यादीत तीन स्थानांची प्रगती करत दुसरे स्थान पटकावले आहे.
फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा हॅरी ब्रूक ८६१ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचाच सहकारी जो रूट ८१६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा एका स्थानाची प्रगती करत ८०७ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड एका स्थानाने घसरून ७९९ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आला आहे. तर स्टीव्ह स्मिथ ७९० गुणांसह पाचव्या स्थानावर कायम आहे.
भारतीय फलंदाजांमध्ये ऋषभ पंतने एका स्थानाची सुधारणा करत ७४४ गुणांसह सहावे स्थान मिळवले आहे. कर्णधार शुभमन गिलने दोन स्थानांची प्रगती करत ७२८ गुणांसह सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र दोन स्थानांनी घसरून आठव्या क्रमांकावर आला आहे. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने मात्र सर्वाधिक पाच स्थानांची झेप घेतली आहे. ७१३ गुणांसह तो आता नवव्या क्रमांकावर पोहोचला असून, काही काळासाठी पहिल्या दहामधून बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा अव्वल दहामध्ये स्थान मिळवले आहे. अफगाणिस्तानचा रहमत शाह दोन स्थानांनी घसरून दहाव्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तीन स्थानांची मोठी झेप घेत ८५६ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. गोलंदाजांच्या अव्वल दहामध्ये स्थान मिळवणारा बुमराह हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.