डोलू विमानतळाला केंद्राची मंजुरी

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
गुवाहाटी,
dholu-airport ईशान्य भारतातील हवाई वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आसाममधील सिलचर येथील डोलू परिसरात अत्याधुनिक ग्रीनफील्ड विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २,०१४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नवीन विमानतळामुळे बराक खोऱ्यासह ईशान्य भारतातील विविध भागांचा हवाई संपर्क अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
 
dholu-airport
 
प्रस्तावित विमानतळावर प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये १२ हजार ३५१ चौरस मीटर क्षेत्रफळाची टर्मिनल इमारत उभारण्यात येईल. विमानतळाची धावपट्टी २ हजार ७०५ मीटर लांब आणि ४५ मीटर रुंद असणार आहे. गर्दीच्या वेळेत या विमानतळावरून तासाला ८०० प्रवाशांची वाहतूक हाताळता येईल. यामध्ये ४०० आगमन आणि ४०० निर्गमन करणाऱ्या प्रवाशांचा समावेश असेल. वार्षिक सुमारे १०.१ लाख प्रवाशांची ये-जा हाताळण्याची क्षमता या विमानतळात असेल.
 
या प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारा संपूर्ण निधी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून (एएआय) उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्राधिकरण आपल्या अंतर्गत आर्थिक स्रोतांचा वापर करून विमानतळाचे बांधकाम करणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद एएआय स्वतः करणार आहे.
 
सिलचरमधील सध्याचे विमानतळ भारतीय हवाई दलाच्या मालकीचे असून, भारतीय विमानतळ प्राधिकरण सुमारे ७० एकर जागेवर नागरी विमान वाहतुकीची सुविधा चालवते. या विमानतळावर सध्या ए३२० आणि बी७३७-८०० प्रकारची विमाने हाताळली जातात. मात्र, प्रवाशांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध टर्मिनलवर ताण निर्माण झाला आहे. त्यातच सध्याच्या परिसरात विस्तारासाठी पुरेशी जागा नसल्याने स्वतंत्र विमानतळ उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
डोलू येथील नव्या विमानतळामुळे बराक खोऱ्यातील नागरिकांना अधिक चांगली हवाई वाहतूक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय ईशान्य भारतातील पर्यटन आणि व्यावसायिक क्षेत्रालाही याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या भागात उत्पादित होणारी फळे, भाजीपाला आणि अन्य बागायती उत्पादने हवाई मार्गाने देशातील विविध बाजारपेठांपर्यंत पोहोचवणे अधिक सोपे होईल. त्यामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळण्यासोबतच ईशान्य भारताच्या आर्थिक विकासालाही हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.