योगींचा विरोधकांवर राजकीय प्रहार!

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
लखनौ,
chief-minister-yogi-adityanath उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपावरून सुरू असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली आहे. यापूर्वी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आघाडीचे अपयश समोर येत होते, मात्र यावेळी निवडणुकीपूर्वीच या आघाडीची परिस्थिती बिकट झाली आहे, असा टोला योगी यांनी लगावला. बुधवारी लखनौ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या आघाडीच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित केले.
 
chief-minister-yogi-adityanath
 
समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपासाठी चर्चा सुरू असतानाच उमेदवारांची नावे जाहीर केली जात असल्याकडे योगी यांनी लक्ष वेधले. एकीकडे जागांबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते आणि दुसरीकडे उमेदवार घोषित केले जातात. यापेक्षा मोठा अपमान कोणता असू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे सांगत त्यांनी या परिस्थितीला 'चेकमेट'च्या राजकारणाची उपमा दिली. काँग्रेससारख्या देशातील सर्वांत जुन्या पक्षाची अशी अवस्था होण्यामागे त्यांची नकारात्मक विचारसरणी कारणीभूत असल्याचेही त्यांनी म्हटले.
 
दोन्ही पक्षांमधील जागावाटपाच्या वादावर बोलताना योगी यांनी आघाडीच्या राजकारणात परस्पर समन्वय, नियम आणि शिष्टाचार महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मात्र, सपा आणि काँग्रेसमधील सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्यात एकमत नसल्याचे स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केली. दुसरीकडे, एनडीएमधील जागावाटपावरून कोणताही वाद नसल्याचा दावा त्यांनी केला. निषाद पार्टी आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीसह सर्व मित्रपक्ष एनडीएमध्ये एकत्र असून आगामी निवडणूक सर्वजण मिळून लढवतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या अयोध्या दौऱ्याबाबतही योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले. सनातन धर्माबाबत समाजवादी पक्षाच्या बदललेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी केवळ अयोध्येला भेट देणे पुरेसे नसल्याचे म्हटले. समाजवादी पक्षाने रामभक्तांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. १९९० च्या दशकातील परिस्थितीचा संदर्भ देत त्यावेळी अशी समजूत असती, तर रामभक्तांवर गोळीबार करण्याची वेळ आली नसती, अशी टिप्पणी मुख्यमंत्री योगी यांनी केली.