छत्रपती संभाजीनगर,
mohan-bhagwat “विकसित भारत घडवायचा असेल, तर त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. देशात देशहितासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणारे असंख्य लोक आहेत. त्यामुळे देश वेगाने प्रगती करत आहे. २०४७ मधील सशक्त भारत हा जगाला दिशा देणारा असेल. भारताला शक्तिशाली व्हायचे आहे ते दुर्बलांना काबूत ठेवण्यासाठी नव्हे, तर त्यांचे रक्षण करण्यासाठी,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केले. ते पाचव्या पद्म फेस्टिव्हलमध्ये बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर निवृत्त सीडीएस जनरल अनिल चौहान, पद्म फेस्टिव्हलचे अध्यक्ष मिलिंद केळकर, स्वागताध्यक्ष उन्मेश टाकळकर आणि श्रीमती मंगला केंडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या दोन दिवसीय पद्म फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले. या पाचव्या पद्म फेस्टिव्हलमध्ये एअर मार्शल पद्मा बंडोपाध्याय (निवृत्त), श्री. रमेश पतंगे, डॉ. शुभा व्ही. अय्यंगार, डॉ. बी. एन. गंगाधर, श्री. देवेंद्र झाझरिया, श्री. भिकल्या लाडक्या धिंडा, श्री. श्रीरंग (दादा) लाड, श्रीमती पद्मजा फेणाजी जोगळेकर, डॉ. एन. राजम, श्री. फैसल अली डार, श्रीमती चामी मुर्मू, श्री. जार्देन लेपचा आदी पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सन्मान करण्यात आला असून या सर्व मान्यवरांची या दोन दिवसीय कार्यक्रमात उपस्थिती राहणार आहे. तसेच शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. मोहन भागवत म्हणाले, “कोणताही चांगला बदल घडवायचा असेल, तर आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. हा आत्मविश्वास उदाहरणांतून मिळतो. एका व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे लगेच बदल दिसून येत नाही; मात्र सामूहिक प्रयत्नांतून परिवर्तन घडते. आपल्या महापुरुषांनी हेच दाखवून दिले आहे. त्यांनी सुरुवात स्वतःपासून केली. संघाचा स्वयंसेवक समाजातील दुःख पाहतो, तेव्हा त्यावर काम करण्यासाठी केवळ विचार करत बसत नाही, तर प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करतो. त्यानंतर त्याला आपोआप सहकार्य मिळू लागते. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देशात चुकीचे काम करणाऱ्या लोकांपेक्षा अनेक पट अधिक लोक निःस्वार्थ भावनेने चांगल्या हेतूने काम करत आहेत. देशभर प्रवास करताना आम्हाला हे अनुभवायला मिळते. त्यामुळे चांगले काम करणाऱ्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या कामाकडे नकारात्मक दृष्टीने पाहणे योग्य नाही असे ते म्हणाले.
‘भारत’ हे केवळ नाव नाही, तर तीच आपली ओळख – (निवृत्त) जनरल अनिल चौहान
निवृत्त जनरल अनिल चौहान म्हणाले, “आज ‘भारत’ या शब्दाचा सर्वत्र मोठ्या गौरवाने वापर होत आहे. पूर्वी भारताकडे जुन्या संदर्भातून पाहिले जायचे; परंतु आज जगाला नव्या भारताचे दर्शन होत आहे. भारत हीच आपली ओळख असून, हा शब्द आपली परंपरा, संस्कृती आणि समान इतिहास दर्शवतो. आपल्याला २०४७ मधील विकसित, सशक्त आणि सक्षम भारत घडवण्यासाठी काम करायचे आहे. आपल्याकडे युवाशक्ती आहे आणि तिच्यावर मोठी जबाबदारी आहे. कोणतेही ध्येय साध्य करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. बाहेरील धोक्यांपेक्षा अंतर्गत धोके अधिक धोकादायक असतात. त्यामुळे आपल्याला कायम सतर्क राहावे लागणार आहे. तसेच, आभासी माध्यमांतून भारतीय एकता आणि अखंडता तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की, जेव्हा जेव्हा आपला समाज आपापसांत वाद करून विभाजित झाला, तेव्हा तेव्हा परकीय आक्रमणे झाली आणि आपण गुलामीत गेलो. त्यामुळे आपली एकता आणि अखंडता हीच आपली सर्वांत मोठी ताकद आहे,” असे ते म्हणाले.