अनिल कांबळे
नागपूर,
diamond investment fraud in nagpur हिऱ्यांच्या व्यापारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल आणि गुंतवलेल्या रकमेवर अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची तब्बल १ कोटी ७२ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अयोध्यानगर परिसरातील अनुप प्रमोद पोहनकर (वय ३४) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम मारोती कुंभलकर (वय ३१, रा. हंसापुरी, जुना भंडारा रोड, नागपूर) हे कोराडी औष्णिक वीज प्रकल्पात ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. आरोपी अनुप पोहनकर याने हिऱ्यांच्या व्यापाऱ्याकडे पैशांची गुंतवणूक करत असल्याचे सांगून या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्याची बतावणी केली. गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळण्याचे आश्वासन देत त्याने कुंभलकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर १ मार्च २०२५ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना कुंभलकर यांच्याकडून हिऱ्यांच्या व्यापारात गुंतवणूक करण्यासाठी एकूण १ कोटी ७२ लाख रुपये घेतले. मात्र, आरोपीने या रकमेची कोणत्याही प्रकारे गुंतवणूक न करता ती स्वतःकडेच ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अशा प्रकारे विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक आणि पैशांचा अपहार केल्याची तक्रार प्राप्त झाली. तक्रारीच्या चौकशीनंतर वरिष्ठांच्या आदेशाने पोलिसांनी अनुप पोहनकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक झाली आहे किंवा नाही, याबाबत उपलब्ध नोंदीत स्पष्ट माहिती नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे