नागपूर,
vice-presidents-appeal महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षण हा सर्वात प्रभावी मार्ग असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे. शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमीत कमी, शक्य असल्यास शून्यावर आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्वयंसिद्धा केंद्राच्या वतीने आयोजित ‘स्वयंसिद्धा राष्ट्रीय परिषद – २०२६ : विजया’ (व्हिजन, इन्क्लुजन, जस्टिस, एजन्सी, यंग वुमन ॲज लीडर्स, अचिव्हमेंट) या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन बुधवारी नागपुरात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते.
यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले की, कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थिनींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये. प्रत्येक मुलीला तिच्या क्षमता विकसित करण्याची समान संधी मिळाली पाहिजे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांपर्यंत शिक्षण, डिजिटल सुविधा आणि कौशल्य प्रशिक्षण पोहोचविणे आवश्यक आहे. महिला सक्षमीकरण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून विद्यापीठे, उद्योगजगत आणि समाजानेही त्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.
भारतीय संविधान सभेतील १५ महिला सदस्यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी महिलांच्या ऐतिहासिक भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे महिलांना राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उच्च शिक्षणामध्ये मुलींचा वाढता सहभाग ही समाधानाची बाब असल्याचे सांगत महिला सक्षमीकरणापुरते मर्यादित न राहता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वयंसिद्धा हा उपक्रम केवळ परिषद आणि चर्चांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरला पाहिजे. महिलांच्या यशोगाथांची नोंद ठेवून त्या इतरांसाठी प्रेरणादायी बनवाव्यात आणि या उपक्रमाचा देशभर विस्तार करावा, अशी अपेक्षाही उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.
प्रत्येक विद्यापीठात स्वयंसिद्धा उपक्रम राबविणार: राज्यपाल
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी स्वयंसिद्धा उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयापर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. महिलांना स्वावलंबी, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या सशक्त बनविण्यासाठी कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, उद्योजकता आणि नेतृत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी स्वयंसिद्धा उपक्रमाची विशेष शैक्षणिक दिनदर्शिका तयार केली आहे. ही दिनदर्शिका राज्यातील सर्व विद्यापीठांना पाठविण्यात आली असून, त्यानुसार विविध उपक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठांना दर तीन महिन्यांनी प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे. राज्यपालांचे सचिवालय या कामाचा नियमित आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थिनींच्या गरजेनुसार डिजिटल साक्षरता, कायदेविषयक जागरूकता, आरोग्य, सुरक्षितता, करिअर मार्गदर्शन आणि उद्योजकता या विषयांवर उपक्रम राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. भारताच्या अंध महिला क्रिकेट संघाने मिळविलेले यश हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय साध्य करण्याचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले.
महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्याचा संकल्प व्यक्त करताना, उपक्रमांचे यश केवळ आयोजित कार्यक्रमांच्या संख्येवर नव्हे, तर महिलांना मिळालेल्या संधी, त्यांच्यात निर्माण झालेला आत्मविश्वास आणि त्यांनी मिळविलेल्या यशावर मोजले जाईल, असे त्यांनी सांगितले.
पुस्तकांचे प्रकाशन आणि लोगोचे अनावरण
यावेळी स्वयंसिद्धा उपक्रमाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘हंड्रेड व्हॉइसेस ऑफ यंग वुमन’ या पुस्तकाचे आणि ‘बेस्ट प्रॅक्टिसेस कॉम्पेंडियम’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवसीय या राष्ट्रीय परिषदेत महिला नेतृत्व, समावेशकता, न्याय, संधी, कौशल्य विकास आणि महिलांच्या यशोगाथा अशा विविध विषयांवर चर्चा व अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे.
कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. विजय खांडेल, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, स्वयंसिद्धा केंद्राच्या नोडल समन्वयक तथा परिषदेच्या आयोजन सचिव डॉ. शालिनी लहितकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.