शिमला
Himachal Pradesh हिमाचल प्रदेश भाजपचे अध्यक्ष डॉ. राजीव बिंदल यांनी पक्षाच्या १२ सदस्यीय राज्य कोअर कमिटीची घोषणा केली आहे. या समितीमध्ये दोन विशेष निमंत्रितांचाही समावेश करण्यात आला असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

नव्या कोअर कमिटीमध्ये भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर, राज्याचे संघटन सरचिटणीस सिद्धार्थन आणि लोकसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा समावेश आहे. याशिवाय माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार सुरेश कश्यप, आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती, खासदार राजीव भारद्वाज, प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार विपिन सिंह परमार, राज्यसभा खासदार व प्रदेश सरचिटणीस डॉ. सिकंदर कुमार तसेच प्रदेश सरचिटणीस पायल वैद्य आणि संजीव कटवाल यांनाही समितीत स्थान देण्यात आले आहे. भाजपचे राज्य प्रभारी श्रीकांत शर्मा आणि सहप्रभारी दर्शना सिंह यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, नव्या यादीतून राज्यसभा खासदार हर्ष महाजन यांना वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महाजन यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यांच्या पक्षांतरामुळे हिमाचल प्रदेशातील काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला होता. विधानसभेतील ६८ पैकी ४० आमदारांचे संख्याबळ असूनही काँग्रेसला राज्यसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.
कोअर कमिटीच्या नव्या रचनेतून दोन माजी मुख्यमंत्री पी. के. धुमल आणि शांता कुमार यांनाही वगळण्यात आले आहे. यापूर्वी या दोन्ही नेत्यांचा पक्षाच्या या महत्त्वाच्या समितीत समावेश होता. मात्र, नव्या नियुक्त्यांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, हिमाचल प्रदेशातील चार लोकसभा खासदारांपैकी मंडीच्या खासदार कंगना रणौत यांनाच कोअर कमिटीतून वगळण्यात आले आहे. कंगना या पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आल्या आहेत. दुसरीकडे, कांगडा मतदारसंघाचे खासदार राजीव भारद्वाज यांना मात्र समितीत स्थान देण्यात आले आहे.