बेलारूसच्या चित्रपट महोत्सवात भारतीय सिनेमाचा गौरव

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
मिन्स्क
hathi hathi pa pa
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. निर्माते अरुणव मिड्या यांच्या ‘हाथी हाथी पा पा’ या बंगाली चित्रपटाने बेलारूसमधील ३२ व्या मिन्स्क आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (लिस्टापॅड) सर्वोत्कृष्ट ध्वनी अर्थात ‘बेस्ट साउंड (ओरिजिनल स्कोअर)’ पुरस्कार पटकावला आहे. ‘लव्ह यू, डॅड’ या नावाने महोत्सवात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला फिक्शन फिल्म विभागात हा सन्मान मिळाला. महोत्सवाच्या अधिकृत डिप्लोमामध्ये रणजॉय भट्टाचार्य आणि अनिर्बान दास यांना पुरस्काराचे मानकरी घोषित करण्यात आले. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी या दोघांनी सांभाळली आहे.



सेल्युलॉइड फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते अरुणव मिड्या यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. लिस्टापॅडमध्ये सहभागी होणे आणि तेथील प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेला प्रतिसाद अनुभवणे हा भावनिक क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. हा पुरस्कार संपूर्ण टीमसाठी अभिमानास्पद असून, विशेषतः रणजॉय भट्टाचार्य आणि अनिर्बान अजय दास यांच्या संगीताचा गौरव झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या संगीतामुळे चित्रपटातील कथेच्या भावविश्वाला वेगळी भावनिक अभिव्यक्ती मिळाली, असेही मिड्या यांनी सांगितले. चित्रपटाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे श्रेय त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

अर्नब के. मिड्या यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, रुक्मिणी मैत्रा आणि चिरंजीत चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बाप-लेकीच्या नात्याभोवती फिरणारी ही कथा प्रेम, काळजी आणि दोन पिढ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते संवेदनशीलपणे मांडते. भावनांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या या कथानकामुळे भाषेच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून चित्रपटाला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांशी संवाद साधता आला आहे.

चित्रपटाच्या स्ट्रॅटेजिक पार्टनर जयिता घोष यांनीही या पुरस्काराचे महत्त्व स्पष्ट केले. सिनेमा हे वेगवेगळ्या संस्कृती आणि समाजांतील लोकांना जोडणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या अधिकाधिक संधी मिळायला हव्यात, असे सांगताना त्यांनी सिनेमाला ‘सॉफ्ट पॉवर’चे महत्त्वाचे साधन संबोधले. भाषा आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी प्रेम, प्रतीक्षा आणि आपलेपणा यांसारख्या भावना जगभरातील माणसांना समान पद्धतीने जोडतात. या भावनांच्या माध्यमातून सिनेमा विविध संस्कृतींमध्ये पूल निर्माण करतो, असे घोष यांनी नमूद केले.

जयिता घोष या ‘जयिता स्ट्रॅटेजिया (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड’च्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. कंपनीच्या ‘सिनेमा कनेक्ट’ या बौद्धिक संपदा उपक्रमातून त्या चित्रपटांसाठी आंतरराष्ट्रीय प्रोग्रामिंग, विक्री, वितरण आणि सीमापार भागीदारीच्या संधी निर्माण करण्याचे काम करतात. ‘हाथी हाथी पा पा’सोबतची त्यांची स्ट्रॅटेजिक भागीदारी चित्रपटाचा जागतिक स्तरावरील प्रवास अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.

बेलारूसमधील मिन्स्क येथे आयोजित करण्यात आलेल्या ३२ व्या लिस्टापॅड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ५५ देशांतील एकूण १३९ चित्रपट प्रदर्शित झाले. अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ‘हाथी हाथी पा पा’ने मिळवलेला पुरस्कार भारतीय चित्रपटासाठी गौरवाची बाब ठरली आहे. आता हा चित्रपट बेलारूसमधील चित्रपटगृहांतही प्रदर्शित करण्याची तयारी सुरू असून, तेथील प्रेक्षकांना ही भारतीय कथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे.