जयसिंगपूर
Kolhapur Murder Case चारचाकी वाहनाला दुचाकी आडवी घातल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात घडली. कोथळी येथे विकास बाबूराव बोंद्रे (वय ४५, रा. हरिपूर, ता. मिरज, जि. सांगली) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. मंगळवारी (२४ नोव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणातील संशयित हल्लेखोर अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल (वय ३६, रा. कोथळी, ता. शिरोळ) हा घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याच्यावर यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे.

विकास बोंद्रे हे मंगळवारी रात्री चारचाकी वाहनाने कोल्हापूरहून हरिपूरच्या दिशेने जात होते. कोथळी रस्त्यावर त्याचवेळी दुचाकीवरून येणाऱ्या अभी पाटील-धडेल याच्या वाहनाशी त्यांच्या गाडीची कट मारण्याच्या कारणावरून धडक टळली; मात्र यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीच्या परिस्थितीत होण्यापूर्वीच संशयिताने जवळील सुरी बाहेर काढली आणि बोंद्रे यांच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बोंद्रे यांना त्यांच्या मित्राने तातडीने सांगली येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर घोषित केले.
विकास बोंद्रे हे हरिपूरच्या माजी सरपंच कविता बोंद्रे यांचे पती होते. त्यांच्या हत्येची बातमी समजताच हरिपूर परिसरात खळबळ उडाली. वाहन आडवे घातल्याच्या किरकोळ कारणावरून काही जणांनी हा प्रकार घडविल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात जयसिंगपूर पोलिसांनी दोन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याचे समजते. मुख्य संशयित अभी पाटील-धडेल याचा शोध सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.