मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर मनोज जरांगे पाटील ७ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
जालना
manoj jarange patil 
 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारला मागण्यांची पूर्तता करण्यासाठी काही काळाची मुदत दिली आहे. मात्र, राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आणि आरक्षणाचे लाभ मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अद्यापही विविध प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुणबी नोंदी असूनही आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच कुणबी जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना निर्माण होणाऱ्या समस्यांचा प्रश्न कायम आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आता राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली असून, ७ डिसेंबरपासून त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होणार आहे.



या दौऱ्याच्या माध्यमातून जरांगे पाटील राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊन तेथील मराठा बांधवांशी थेट संवाद साधणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक दिवस राखून ठेवण्यात येणार असून, संबंधित जिल्ह्यातील आरक्षण प्रमाणपत्रांबाबतच्या अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांची माहिती ते जाणून घेतील. विशेषतः कुणबी नोंदी उपलब्ध असूनही अद्याप प्रमाणपत्र न मिळालेल्या नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर त्यांचा भर राहणार आहे.

हैदराबाद गॅझेटनुसार पात्रता असूनही संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे की नाही, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणत्या प्रशासकीय अडचणी येत आहेत, तसेच जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत कोणत्या समस्या निर्माण होत आहेत, याची माहिती प्रत्येक जिल्ह्यात संकलित केली जाणार आहे. या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश आणि उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळवताना अडथळे येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या या महाराष्ट्र दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम १ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे दौऱ्यात कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाणार आणि आरक्षण प्रमाणपत्रांच्या प्रश्नांवर सरकारकडे कोणत्या मागण्या मांडल्या जाणार, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.