अनिल कांबळे
नागपूर,
nagpur merchant navy officer dies विवाहाची स्वप्ने रंगवत नव्या आयुष्याची तयारी सुरू असतानाच मर्चंट नेव्हीतील अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुहास माधव भोयर (४३, रा. महालक्ष्मीनगर, हुडकेश्वर) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल ऑक्साइनच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अवघ्या सहा दिवसांपूर्वी, १५ नोव्हेंबरला त्यांचा साखरपुडा झाला होता. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुहास भोयर ४ नोव्हेंबरला सुटीवर नागपुरात आले होते. १९ नोव्हेंबरला त्यांनी सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल ऑक्सा इनमध्ये खोली घेतली होती. त्या रात्री त्यांचे मित्र प्रशांत चुटे आणि भूपेश टिचकुले हेही त्यांच्यासोबत होते. तिघांनी रात्री उशिरापर्यंत एकत्र वेळ घालवला. पहाटे तीनच्या सुमारास दोन्ही मित्र घरी परतले. २० नोव्हेंबरच्या सकाळी सुहास यांनी एका मित्राला फोन केला होता. त्यानंतर मित्राने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचा मोबाइल बंद येत असल्याने मित्र आणि कुटुंबीयांची चिंता वाढली. अखेर २१ नोव्हेंबरला मित्र आणि नातेवाइकांनी हॉटेल गाठले. खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल व्यवस्थापनाच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी सुहास हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रण, मोबाइल कॉलचा तपशील आणि नातेवाइकांसह मित्रांचे जबाब तपासत आहेत. मोबाइलमधील माहिती मिळविण्यासाठी तांत्रिक मदत घेण्याचाही विचार सुरू आहे. साखरपुड्यानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करण्याच्या तयारीत असलेल्या सुहास यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, याचा उलगडा तपासातून होणार आहे.