मृत्यूला कवटाळायला निघाला, पोलिसांनी जीवनाकडे आणले परत

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur police
सायंकाळची वेळ... अंधाराची चाहूल... अंबाझरी तलावाचे शांत पाणी... मनात नैराश्याचे काहूर व जगण्याची आशा हरवलेला एक युवक! काही क्षण तलावाच्या काठावर बसल्यानंतर त्याने अचानक पाण्यात उडी घेतली. क्षणार्धात तो पाण्यात बुडू लागला. आरडाओरड ऐकताच गस्तीवरील दोन पोलिस कर्मचारी मदतीसाठी धावले. पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या तरुणाला बाहेर काढले. मृत्यू समोर दिसत असताना त्याला पोलिसांच्या तत्परतेमुळे नवजीवन मिळाले. पुढे पोलिसांनी त्याचे समुपदेशन करून त्याला पालकांच्या स्वाधीन केले. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर (२२, काल्पनिक नाव) हा बिडीपेठ परिसरात आई-वडिलांसह राहतो. परिसरातील एका विवाहितेशी त्याची ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतल्याने त्यांच्यात संवाद वाढला. मात्र, समीर तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. हे नाते अडचणीचे ठरत असल्याने महिलेने त्याला समजावून सांगितले. मात्र, तो ऐकण्यास तयार नव्हता. अखेर महिलेने त्याच्याशी संपर्क कमी केला. या घटनेचा समीरच्या मनावर परिणाम झाला. नैराश्यातून त्याने यापूर्वीही गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातून बचावल्यानंतरही त्याच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. आई-वडिलांनी त्याला समजावण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, त्याचा एकटेपणा व नैराश्य वाढतच गेले.

घरातून निघाला अन् घेतली तलावात उडी

गेल्या आठवडाभरापासून समीर घरात कुणाशीही बोलत नव्हता. अखेर त्याने आत्महत्येचा विचार केला. मंगळवारी सकाळी घरातून बाहेर पडलेला समीर सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अंबाझरी तलावाजवळ पोहोचला. काही वेळ तलावाच्या काठावर बसल्यानंतर त्याने पाण्यात उडी घेतली. यावेळी सीआर वाहनावर कर्तव्यावर असलेल्या पोलिस हवालदार मनीषा कटरे व हवालदार घनश्याम काळबांडे यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तलावाच्या दिशेने धाव घेतली. जवळच मासेमारी करणाऱ्या युवकांची मदत घेत त्यांनी समीरला पाण्याबाहेर काढले. वेळीच मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.

समुपदेशनाने दिला जगण्याचा आधार

समीरला अंबाझरी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या पालकांना बोलावण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मीना बारंगे यांनी त्याचे समुपदेशन केले. त्याला धीर देत परिस्थितीला सामोरे जाण्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलाला सुखरूप पाहून पालकांनी पोलिसांचे आभार मानले. एका क्षणाच्या नैराश्यातून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलेल्या युवकाला पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा जगण्याची संधी मिळाली.