नागपूर
Volleyball ४० व्या लोहमार्ग पोलीस परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा २०२६ अंतर्गत पुरुष व्हॉलीबॉल आणि महिला खो-खो स्पर्धा नागपूर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत नागपूर रेल्वेच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत द्वितीय क्रमांक पटकावला. तर महिला खो-खो स्पर्धेत नागपूर संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत मुंबई संघाने विजेतेपद मिळविले, तर नागपूर संघाने रौप्यपदकाची कमाई केली. पुणे संघ तृतीय क्रमांकावर राहिला. मुंबई संघाने पुण्याचा २५-१३, २५-१५ असा पराभव केला. नागपूर संघाने पुण्याविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करीत २३-२५, २५-१६, २५-१५ अशी विजयाची नोंद केली. मात्र अंतिम सामन्यात मुंबईने नागपूरचा २५-२०, २५-२१ असा पराभव करीत विजेतेपदावर नाव कोरले.
महिला खो-खो स्पर्धेतही मुंबई संघाने निर्विवाद वर्चस्व राखत प्रथम क्रमांक मिळविला. पुणे संघ द्वितीय, तर नागपूर संघ तृतीय क्रमांकावर राहिला. मुंबईने पुण्याचा एक डाव व पाच गुणांनी, तर नागपूरचा एक डाव व दहा गुणांनी पराभव केला. पुणे संघाने नागपूरवर तीन गुणांनी मात केली.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड, पोलीस उपअधीक्षक (गृह) रविंद्र शिंदे यांच्यासह सपोनि रवींद्र फड, राखीव पोलीस निरीक्षक विजय वानखडे, राखीव पोलीस उपनिरीक्षक सतीश रणित आणि क्रीडा प्रमुख पोलीस कॉन्स्टेबल भोलाशंकर उपरीकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना व खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.