अनिल कांबळे
नागपूर,
nagpur robbery case शांतिनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुलसीनगर येथे व्यापारी सुरेश परमार यांच्या कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला करून ३.७४ कोटी रुपयांची रोकड लुटल्याच्या सशस्त्र दरोड्याचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील डोरली माल गावातील शेतात भुसाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलेली ३ कोटी २८ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणात चंद्रकांत बघेल आणि रजनीकांत चंद्रभान यांना अटक करण्यात आली असून, अन्य सहा आरोपी फरार आहेत. या दरोड्यात एकूण आठ जणांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासात लुटलेली रोकड मध्य प्रदेशात नेण्यात आल्याचे उघड झाले. सुमारे चार दिवसांपूर्वी ही रक्कम तीन पोत्यांमध्ये भरून डोरली माल गावातील दिनेश डहरवाल यांच्या शेतात भुसाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आली होती. आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने शेतात शोधमोहीम राबवून ही रक्कम जप्त केली. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी तुलसीनगर परिसरात तांदूळ व्यवसायी सुरेश परमार यांच्या कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यानंतर रोकड असलेली एसयूव्ही लुटून आरोपी पसार झाले होते. तपासात हा दरोडा पूर्वनियोजित असल्याचे समोर आले आहे. शुभम डहरवाल, अजय यादव आणि रितेश मरस्कोल्हे यांनी झूमकार अॅपच्या माध्यमातून कार बुक केली होती. या कारचा वापर करून त्यांनी व्यापाऱ्याच्या घराची रेकी केली. व्यापाऱ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून दरोड्याची योजना आखण्यात आली. गुन्ह्यानंतर आरोपींनी बालाघाट रेल्वेस्थानकावर कार उभी केली होती.
दोघांना अटक; सहा आरोपींचा शोध
या प्रकरणात चंद्रकांत बघेल आणि रजनीकांत चंद्रभान यांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींमध्ये शुभम डहरवाल, अजय यादव, विशाल सोनगडे आणि रितेश मरस्कोल्हे यांची नावे समोर आली आहेत. याशिवाय गिट्टीखदान परिसरातील जगदीशनगर येथील जुनघरे आणि आणखी एका व्यक्तीच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
लुटीच्या प्रकरणात मोठी रोकड जप्त
नागपुरात अशा प्रकारच्या दरोड्याच्या प्रकरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड जप्त होण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे. जप्त केलेल्या रकमेव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांचाही तपास सुरू असून, फरार आरोपी हाती लागल्यानंतर आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
सीसीटीव्हीमुळे बालाघाटपर्यंत माग
दरोड्यानंतर आरोपी मध्य प्रदेशच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दिसले होते. पोलिसांनी त्यांच्या मार्गावरील सीसीटीव्ही आणि टोलनाक्यांवरील चित्रण तपासले. या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांचे पथक डोरली माल गावापर्यंत पोहोचले आणि शेतात लपवलेली रोकड हस्तगत केली.
वरिष्ठांच्या नेतृत्वात कारवाई
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त (उत्तर) विनिता साहू, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि परिमंडळ-३ चे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वाखाली शांतिनगर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. फरार आरोपींना अटक करणे, प्रत्येकाची भूमिका निश्चित करणे आणि जप्त केलेल्या रकमेच्या स्रोताचा तपास करणे, यावर पोलिसांचा भर आहे.