नवी दिल्ली,
players-from-17-countries आगामी आयपीएल हंगामाच्या लिलावासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यंदाच्या लिलावासाठी तब्बल १,२२० खेळाडूंनी नोंदणी केली असून, त्यात १७ देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, उपलब्ध जागा मर्यादित असल्याने यापैकी केवळ ६६ खेळाडूंनाच संघांमध्ये स्थान मिळू शकणार आहे. बीसीसीआयकडून अंतिम यादीत आणखी कपात होण्याची शक्यताही आहे.
आगामी आयपीएलसाठीचा लिलाव १६ डिसेंबर रोजी गोव्यात पार पडणार आहे. या लिलावासाठी नोंदणी केलेल्या १,२२० खेळाडूंमध्ये ९३९ भारतीय आणि २८१ परदेशी खेळाडू आहेत. दहा फ्रँचायझींनी यापूर्वीच एकूण १८४ खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे आता लिलावात जास्तीत जास्त ६६ खेळाडूंची निवड केली जाईल. यामध्ये २५ जागा परदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत, तर उर्वरित जागांवर भारतीय खेळाडूंची निवड होणार आहे.
नोंदणी केलेल्या खेळाडूंमध्ये १८४ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले खेळाडू, ९९४ आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेले खेळाडू आणि सहयोगी देशांमधील ४२ खेळाडूंचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय अनुभव नसलेल्या खेळाडूंमध्ये ९२५ भारतीय खेळाडू आहेत. याशिवाय मागील आयपीएल हंगामात खेळलेल्या १२७ खेळाडूंनीही यंदाच्या लिलावासाठी नोंदणी केली आहे.
परदेशी खेळाडूंच्या नोंदणीत ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली असून, तेथील ५३ खेळाडूंनी लिलावासाठी नावे दिली आहेत. दक्षिण आफ्रिकेचे ४०, वेस्ट इंडिजचे ३६, न्यूझीलंडचे २५ आणि अफगाणिस्तानचे २३ खेळाडू या यादीत आहेत. सहयोगी देशांमध्ये अमेरिकेच्या १३, तर संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळच्या प्रत्येकी १० खेळाडूंनी नोंदणी केली आहे.
दरम्यान, लिलावात सर्वाधिक खेळाडू निवडण्याची संधी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सकडे आहे. या दोन्ही संघांना प्रत्येकी नऊ खेळाडूंची जागा भरायची आहे. कोलकाता नाइट रायडर्स आठ, लखनौ सुपर जायंट्स सात, तर चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांना प्रत्येकी सहा खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे पाच, तर गुजरात टायटन्सकडे सर्वांत कमी म्हणजेच तीन जागा उपलब्ध आहेत.