बाबा श्याम यांच्या भक्तीचा भाव आता मोठ्या पडद्यावर

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
मुंबई
shyam sharanam movie
काही नाती रक्ताच्या बंधनांपेक्षा श्रद्धेच्या धाग्यांनी अधिक घट्ट जोडली जातात, तर काही प्रवास विश्वास आणि भक्तीच्या बळावर पूर्ण होतात. अशाच श्रद्धा, समर्पण आणि भक्तिभावाची अनुभूती प्रेक्षकांना देण्यासाठी ‘श्याम शरणम्’ हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा श्याम यांच्या पावन जन्मोत्सवाचे औचित्य साधून या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे श्याम भक्तांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


‘श्री श्याम पिक्चर्स प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती संतोष पवार, आदेश पांडे आणि नितीन पोळ यांनी केली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रमेश चौधरी सांभाळणार आहेत. पोस्टर अनावरण सोहळ्याला मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शक्तिसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. बाबा श्याम यांच्या जन्मोत्सवाच्या मंगलमय वातावरणात झालेल्या या अनावरणामुळे चित्रपटाच्या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

चित्रपटाच्या पोस्टरमधून भक्ती आणि श्रद्धेच्या प्रवासाचे प्रभावी दर्शन घडते. एका भक्ताच्या हातात बाबा श्याम यांची पताका असून, तो वाळवंटातून पुढे जात असल्याचे चित्र पोस्टरमध्ये पाहायला मिळते. पार्श्वभूमीला विस्तीर्ण वाळवंट आणि आकाशात प्रकटलेले बाबा श्याम यांचे दिव्य स्वरूप लक्ष वेधून घेते. या दृश्यरचनेतून भक्ताच्या मनातील अढळ विश्वास, संघर्ष आणि समर्पणाचा भाव व्यक्त करण्यात आला आहे.

‘हारे का सहारा… खाटू श्याम हमारा!’ या भक्तिपूर्ण घोषवाक्याभोवती चित्रपटाचे भावविश्व उभे राहणार आहे. असंख्य श्याम भक्तांच्या भावना, श्रद्धा आणि बाबा श्याम यांच्यावरील अतूट विश्वास मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता भक्तांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या चित्रपटाची कथा मिलिंद खानविलकर यांनी लिहिली आहे. छायांकनाची जबाबदारी सिद्धेश संतोष मोरे यांनी सांभाळली असून, मनोज गडकर यांनी सहयोगी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. चित्रपटाच्या तांत्रिक आणि सर्जनशील टीमकडून भक्तीचा हा विषय प्रभावीपणे पडद्यावर साकारण्याची तयारी सुरू आहे.

विशेष म्हणजे, ‘श्याम शरणम्’ हा चित्रपट हिंदी आणि गुजराती अशा दोन भाषांमध्ये २०२७ मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतील बाबा श्याम भक्तांपर्यंत ही भक्तिमय कथा पोहोचण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा संगम असलेला ‘श्याम शरणम्’ मोठ्या पडद्यावर कोणती अनुभूती देणार, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.