सुप्रीम कोर्टाचा उमर खालिदला दणका!

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
supreme-court दिल्ली दंगलीशी संबंधित कथित मोठ्या कटाच्या प्रकरणात तुरुंगात असलेले उमर खालिद आणि शरजील इमाम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोघांच्याही अंतरिम जामिनाची मागणी तूर्तास फेटाळली. तसेच या प्रकरणात दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले.

supreme-court
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी उमर खालिद यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी अंतरिम जामिनाची मागणी केली. मात्र, सरन्यायाधीशांनी ही विनंती स्वीकारण्यास नकार देत 'आज नाही' असे स्पष्ट केले. शरजील इमाम यांच्यावतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनीही दीर्घकाळापासून तुरुंगात असल्याचा मुद्दा उपस्थित करत अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्यांनाही तत्काळ दिलासा दिला नाही.
दरम्यान, उमर खालिद आणि शरजील इमाम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपल्या याचिकांमध्ये दोघांनीही तपास यंत्रणेकडून संरक्षित साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेली एक वर्षाची स्थगिती संपण्याच्या मार्गावर असल्याचे नमूद करत जामिनाची मागणी केली आहे. मात्र, अंतरिम जामिनाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दिल्ली पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यामुळे दोघांच्या जामिनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.